Chandrapur News शिवसेनेने महापौर पदाचा नामांकन अर्ज केला दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर महापौर पदासाठी आज शिवसेना, काँग्रेस आणि भाजप या तिन्ही प्रमुख पक्षांनी अर्ज दाखल केले. आज महापौर पदासाठी सहा तर उपमहापौर पदासाठी पाच नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. चंद्रपुरात एकाही पक्षाला बहुमत नसल्याने अपक्ष आणि शिवसेनेवर सर्वांच्या नजरा आहेत. काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी बहुमतासाठी आणखी चार मतांची गरज आहे. शिवसेनेने पाठिंब्यासाठी ताणून धरत महापौर पद मागितल्याने काँग्रेस आणि भाजपची गणिते बिघडली आहेत. अशातच शिवसेनेने आज महापौर पदासाठी अर्ज दाखल केल्याने खळबळ उडाली.

जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या पत्नी मनस्वी गिऱ्हे यांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केला. तर काँग्रेसकडून चार अर्ज दाखल झाले असून वैशाली महाडोळे, संगीता अमृतकर, सुनंदा धोबे, संगीता भोयर यांचा समावेश आहे. तर उप महापौर पदासाठी राहुल चौधरी यांनी अर्ज दाखल केला,हे उमेदवार खासदार प्रतिभा धानोरकर गटाचे मानले जातात. तर वडेट्टीवार गटाकडून उपमहापौर पदासाठी वसंत देशमुख यांनी अर्ज दाखल केला. तर भाजपकडून संगीता खांडेकर आणि संजय कंचर्लावर यांनी अनुक्रमे महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज सादर केले.

या तिन्ही पक्षांनी आपल्या विजयाचा दावा केलाय. चंद्रपुरात एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने महापौर निवडणूक अतिशय रंजक होण्याची शक्यता आहे. काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेने अर्ज दाखल केल्याने संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दहा तारखेला चित्र नेमके काय असेल, याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.