कोरड्या नदीपात्रात नांगर का फिरवतायत ?

प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन, चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यामध्ये असलेल्या उमा नदीच्या कोरड्या पात्रात नांगर फिरवण्यात आला आहे. कोरड्या नदी पात्रात नांगर फिरताना पाहून अनेकांना प्रश्न पडला होता की हे नेमकं चाललंय तरी काय ? नांगर फिरवण्यामागे एक भन्नाट कल्पना असून ती काय आहे हे  दै.सामनाने याचं उत्तर शोधून काढलं आहे

चिमूर शहराला उमा नदी पात्रातून पाणीपुरवठा केला जातो. गेल्या चार-पाच वर्षांपासून या नदीचं पात्र उथळ झालं. शेतातील मातीचा  पात्रात गाळ साचल्यानं  नदीचा पृष्ठभाग कडक झाला होता. पृष्ठभाग कडक झाल्याने नदीतील पाण्याचा निचरा होण्याचं प्रमाण जवळपास शून्यावर आलं होतं. पाणी झिरपत नसल्याने नदी पात्रात असलेली विहीर आटली आहे.यावर चिमूर पालिकेनं नामी शक्कल लढवली. नदीतील बंधा-याजवळच्या पात्रात नांगर फिरवला. पाणीपुरवठा करणा-या विहिरीजवळील सुमारे ८०० मीटरचं पात्र नांगरुन काढलं. अपेक्षा ही आहे की आता पाणी झिरपायला सुरुवात होईल आणि विहीर पुन्हा तुडुंब भरेल. ही भन्नाट शक्कल कुणी शोधून काढली, हे गुलदस्त्यात असलं, तरी यातून जमिनीत पाणी मुरण्यास निश्चित फायदा होईल, असं अभ्यासकांचं मत आहे.

चिमूर शहरात सध्या तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा यंत्रणेवरील ताण वाढला आहे. त्यात भारनियमानाची भर पडली. पाणीपुरवठा करणा-या स्त्रोतांची पातळी खालावली आहे. शहराला कायमस्वरूपी पाणी पुरवठ्यासाठी उमा नदीवर बंधारा बांधण्यात आला. परंतु त्यानंतर नदीचं खोलीकरण केलं गेलं नाही. परिणामी नदीचं पात्र उथळ झालं. पात्रात आता नावालासुद्धा वाळू दिसत नाही. ही स्थिती बघता पात्राच्या खोलीकरणाची परवानगी उपविभागीय अधिका-यांना मागितली गेली. मात्र परवानगीची प्रक्रिया किचकट असल्यानं नांगर फिरवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. चिमूर हा तसा ग्रामीण भाग आहे, मात्र अशा परिसरातील पालिकेनं अशाप्रकारचा वेगळा विचार करून पाणीप्रश्न सोडवण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद म्हटला पाहिजे. पावसाळा सुरू झाल्यावर या प्रयोगाचे अनुकूल परिणाम दिसून येतील, अशी आशा अभ्यासकांनी व्यक्त केलीय.