आणखी 14 दिवस प्रयत्न सुरू राहणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विक्रम लँडरसोबतचा संपर्क तुटला असला तरी हिंदुस्थानच्या अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांचा संकल्प अतूट आहे. आगामी 14 दिवस आम्ही ‘विक्रम’सोबत पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरूच ठेवणार आहोत अशी माहिती इस्रोचे चेअरमन के. सिवन यांनी ‘डीडी न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे. चांद्रयान-2 मोहीम जवळपास 95 टक्के यशस्वी झाली आहे. चांद्रयान-2 या ऑर्बिटर साडेसात वर्षांपर्यंत कार्यरत राहू शकतो असे ते म्हणाले. हा सेटबॅक नाही. विज्ञानाकडे केवळ रिझल्टच्या दृष्टीने पाहू नये. प्रयोगापाठोपाठ प्रयोग केले पाहिजेत. त्यातून रिझल्ट मिळतो, यश मिळते. इस्रोच्या अन्य अंतराळ संशोधन मोहिमांवर याचा परिणाम होणार नाही. अन्य मोहिमा वेळेत पूर्ण होतील, असेही सिवन यांनी सांगितले. दरम्यान, इस्रोचे माजी चेअरमन जी. माधवन नायर यांनीही चांद्रयान-2 ही मोहीम 95 टक्के यशस्वी झाल्याचे म्हटले आहे.

‘नासा’कडून कौतुक

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने इस्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले आहे. हिंदुस्थानची मोहीम साहसपूर्ण आहे. हिंदुस्थानने कठीण काम साध्य करण्याचा प्रयत्न केला हे खरेच कौतुकास्पद असल्याचे नासाचे शास्त्रज्ञ जेरी लिनेंगर यांनी म्हटले आहे.