चंद्र रुसला! विक्रम हुकला!! अवघा देश इस्रो वैमानिकांच्या पाठीशी

640

ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी अवघा देश जागा होता. इस्रोचे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञांसह जनतेच्या मनात उत्सुकता होती ‘चांद्रयान-2’ हे चंद्राच्या दक्षिण धुवावर उतरण्याच़ी शुक्रवारी मध्यरात्री 1.45 वाजता तो क्षण आला… ‘विक्रम’ लँडरने चंद्रावर उतरण्यास सुरुवात केली. इस्रो सेंटरमधील शास्त्रज्ञ विक्रम लँडरच्या मार्गक्रमणावर बारकाईने लक्ष ठेवून होते. जनतेच्या नजरा टीव्हीवर खिळल्या होत्या. 1.55 वाजता विक्रम लँडर चंद्रावर सॉफ्ट लॅण्डिंग करणार होते. मात्र, अवघा 2.1 कि. मी.चा पल्ला राहिला असताना विक्रम लँडरशी असलेला संपर्क तुटला आणि संपूर्ण देशाचा श्वास रोखला गेला. चंद्र रुसला आणि विक्रम हुकला. स्पर्श होता होता… स्वप्नभंग झाला. मात्र, शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांच्या पाठीशी अवघा देश उभा राहिला. हिंदुस्थानच्या अंतराळ संशोधन संस्थेच्या अर्थात इस्त्रोच्या सेंटरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर होते. त्यांनी शास्त्रज्ञांचे कौतुक करीत धीर दिला.

22 जुलै 2019 रोजी ‘चांद्रयान-2’चे चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण सुरू झाल्यापासून 47 दिवस हे मिशन यशस्वीपणे सुरू होते. सुमारे 4 लाख किलोमीटरचे अंतर पार करून चांद्रयान-2 चंद्राच्या कक्षेत आले. दक्षिण ध्रुवावर उतरणार होते. हा विक्रम झाला असता तर दक्षिण धुवावर यान उतरविणारा हिंदुस्थान जगातील पहिला देश ठरला असता. विक्रम हुकला असला तरी हिंदुस्थानी शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांचे जगभरातून कौतुक होत आहे. ‘विक्रम’ लँडर चंद्रावर कसा उतरतो आणि दक्षिण ध्रुवावर तिरंगा फडकतो याची उत्सुकता, चर्चा गेले काही दिवस देशभर सुरू होती. हा ऐतिहासिक क्षण डोळ्यांत साठवण्यासाठी मध्यरात्री 12 पासून जनतेच्या नजरा टीव्ही स्क्रिनवर होत्या. देश-विदेशातील अनेक चॅनेल्सवर याचे प्रक्षेपण सुरू होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खास या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी बंगळुरूतील इस्रो सेंटरमध्ये मध्यरात्री 12 नंतर उपस्थित होते. देशभरातून 60 विद्यार्थीही येथे ‘बाल वैज्ञानिक’ म्हणून आले होते.

15 मिनिटांचा थरार
‘विक्रम लँडर’ हे चंद्रापासून 35 किमी अंतरावर आल्यानंतर दक्षिण ध्रुवावर उतरण्यासाठी 15 मिनिटे लागतील. हा 15 मिनिटांचा थरार असेल, असे इस्रोचे चेअरमन के. सिवन यांनी शुक्रवारी दुपारी म्हटले होते. नवजात बालक अचानक हातात दिले तर ते इकडेतिकडे दुडदुडेल पण त्यावेळी तुम्हाला बालकाला काळजीपूर्वक सांभाळावे लागेल. विक्रम लँडर आमच्यासाठी बालकच आहे, असे वर्णन सिवन यांनी केले होते. 15 मिनिटात हे बालक दुडदुडले आणि संपर्क तुटला.

नेमके काय घडले…
गेली 47 दिवस ‘चांद्रयान-2’शी व्यवस्थित संपर्क होत होता. मात्र, अखेरच्याक्षणी असे काय झाले की विक्रम लँडरशी संपर्क तुटला. याची वेगवेगळी कारणे, शक्यता शास्त्रज्ञांकडून पडताळून पाहिली जात आहेत.
60 मीटर प्रतिसेकंद वेगाने 335 मीटरपर्यंत विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण धुवाच्या दिशेने आला. मात्र, 2.1 किलोमीटर उंचावर असताना ‘विक्रम’ भरकटले असावे आणि संपर्क तुटला अशी एक शक्यता आहे.

कदाचित विक्रम लँड होताना कोसळले असेल
किंवा चंद्रावर चकरा मारत असेल, कारण अधूनमधून लँडरचा संपर्क होत असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. याशिवाय ऑर्बिटरला लावलेल्या ऑप्टिकल हाय रिझोल्युशन कॅमेराद्वारे (ओएचआरसी) विक्रम लँडरचे फोटो घेतले जातील. यातून कळेल की नेमके ‘विक्रम’चे काय झाले. पण यासाठी काही काळ जावा लागेल.

इस्रोचे प्रमुख के. सिवन यांना अश्रू अनावर, मोदींनी दिला धीर
‘इस्रो’च्या कंट्रोलरूमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोनदा भेट दिली. शुक्रवारी मध्यरात्री भेट दिल्यानंतर शनिवारी सकाळी पुन्हा पंतप्रधान आले. कंट्रोल रूममधून देशाला उद्देशून भाषण केले. सर्व शास्त्रज्ञांशी शेकहँण्ड करीत अभिनंदन केले आणि निरोपाचा प्रसंग आला. इस्रोचे प्रमुख के. सिवन यांचे हृदय जडावल्याचे त्यांच्या चेहऱयावर दिसत होते. निरोप घेताना पंतप्रधान मोदी सिवन यांच्या जवळ आले. सिवन यांनी हात पुढे केला. सिवन यांचे डोळे डबडबले होते. पंतप्रधानांनी सिवन यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली. हात हातात घेत पंतप्रधान मोदी यांनी सिवन यांना मिठी मारली. सिवन यांनी डोळ्यांवरील चष्मा काढला आणि अश्रूंना वाट मोकळी केली. अतिशय भावूक हा क्षण अवघ्या देशाने पाहिला. पंतप्रधानांनी सिवन यांना धीर दिला.

तुम्ही प्रेरणेचा सागर, संपूर्ण देशाला अभिमान!
पंतप्रधान मोदी यांनी दुसऱयांदा सकाळी 8 वाजता इस्रोच्या कंट्रोल रूमला भेट दिली आणि शास्त्रज्ञांचे कौतुक केले. पंतप्रधान म्हणाले, ‘मी रात्री येथे तुमच्या चेहऱयावरील निराशा पाहत होतो. मी तुमची मनःस्थिती जाणून होतो. त्यामुळे अधिक वेळ येथे थांबू शकलो नाही. अनेक रात्री तुम्ही नीट झोपला नाहीत. तुमच्याशी संवाद साधावा अशी इच्छा होती म्हणून मी येथे आलो आहे. मी येथे तुम्हाला उपदेश देण्यासाठी नाही तर प्रेरणा मिळावी म्हणून मी आलो आहे. तुम्ही स्वतःच प्रेरणेचे सागर आहात. आम्ही सारे अमृताचे पुत्र आहोत. अमृताशी अमरत्व जोडले आहे. तुम्ही पुरुषार्थ दाखविला. अवघ्या देशाला तुमचा अभिमान आहे. येणारा काळ सोनेरी असेल. परिणामामुळे निराश न होता पुढे जाणे ही आपली परंपरा आणि संस्कार आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. सध्या आपले ऑर्बिटर चंद्राला अजूनही प्रदक्षिणा घालत आहे. आपला आत्मविश्वास मजबूत झाला आहे, असे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या