मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक बदल करण्यात येत आहेत. आता मालाड स्थानकातही महत्त्वाचे बदल होणार आहेत. त्यामुळे मालाड स्थानकात चढताना किंवा उतरताना झालेले बदल लक्षात ठेवावे लागणार आहे. गोरेगाव कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. त्यासाठी शनिवारी ( 31 ऑगस्ट रोजी) रात्री 10 ते सकाळी 8 या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यानंतर या स्थानाकात बदल होणार आहेत.
पश्चिम रेल्वेवरील मालाड स्थानकात सहाव्या मार्गिकेचे काम करण्यासाठी शनिवारी दहा तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा जम्बो मेगाब्लॉक गोरेगाव ते कांदिवली या स्थानकांच्या दरम्यान असेल. या मेगाब्लॉकमुळे आज रात्री दहा वाजल्यापासून ते रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत धीम्या मार्गावरील अप आणि डाऊन दिशेच्या लोकल या कांदिवली आणि गोरेगावदरम्यान जलद मार्गावर चालवण्यात येतील. या ब्लॉकनंतर स्थानकात चढण्या उतरण्याच्या फलाटांमध्ये बदल होणार आहेत.
सध्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर चर्चगेटकडून गाड्या येतात. मालाड स्थानकात सध्या डाव्या बाजूने प्रवाशांना चढण्यासाठी/ उतरण्याची व्यवस्था आहे. या ब्लॉकनंतर प्रवाशांना उजव्या बाजूला उतरावे लागेल आणि त्याच बाजून चढण्याचीही व्यवस्था असेल.
सध्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर अंधेरी, वांद्रे, चर्चगेटकडे जाणाऱ्या गाड्या येतात. या स्थानाकात फलाट 2 वर डाव्या बाजूने चढण्यासाठी/ उतरण्याची सोय आहे. आता प्रवाशांना उजव्या बाजूला चढण्याची आणि उतरण्याची सोय असेल. हा बदल 8 सप्टेंबर 2024 पासून होणार आहे.
सध्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर चर्चगेटकडून येणाऱ्या जलद गाड्याचा थांबा आहे. सध्या या फलाटावर डाव्या बाजूने प्रवाशांना चढण्याची आणि उतरण्याची सोय आहे. आता तो उजव्या बाजूला स्थलांतरित होईल. त्यामुळे 22 सप्टेंबर 2024 पासून प्रवाशांना उजवीकडे चढण्याची आणि उतरण्याची व्यवस्था असेल.
सध्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर चर्चटगेटच्या दिशेने जलद गाड्याचा थांबा आहे. येथे सध्या डाव्या बाजूला प्रवाशांना चढण्याची आणि उतरण्याची सोय आहे. त्यात आता बदल होणार असून प्रवाशांना उजव्या बाजूला चढावे आणि उतरावे लागणार आहे. हा बदल 29 सप्टेंबर 2024 पासून होणार आहे.