
राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱयांना महायुती सरकारने मोठा गाजावाजा करून 7 ऑक्टोबर रोजी 31 हजार 600 कोटींचे पॅकेज जाहीर केले. दिवाळीपूर्वी मदत शेतकऱयांच्या खात्यात जमा होईल असे आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र दिवाळी संपली तरी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. पैसा हातात नसल्याने शेतकऱयांची दिवाळीही यंदा अंधारात गेली. याचे तीव्र पडसाद आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले. मंत्री आणि अधिकाऱयांची खडाजंगी झाली.
शेतकऱ्यांना अद्याप मदत का पोहोचली नाही याबद्दल अधिकाऱयांना जाब विचारण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आतापर्यंत किती मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली याचा अहवाल तातडीने सादर करा, असे निर्देश मुख्य सचिव राजेश कुमार यांना दिले. अतिवृष्टीमुळे मराठवाडा, सोलापूर व अन्य भागांतील शेतकऱ्यांची पिके आणि संसार वाहून गेले, शेतातली जमीन खरडून गेली, विहिरी गाळाने भरल्या. विरोधी पक्षांनी शेतकऱयांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी यासाठी जोरदार पाठपुरावा केल्यानंतर महायुती सरकारने मदतीचे पॅकेज जाहीर केले, परंतु घोषणेनंतर आज वीस दिवस उलटल्यानंतरही बहुतांश शेतकऱयांपर्यंत मदत पोहोचलेली नाही. कुठे पंचनामे अडलेत तर कुठे निकषांवरून अधिकारी अडवणूक करत असल्याच्या लोकप्रतिनिधींच्या तक्रारी आहेत.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज याच मुद्दय़ावरून मंत्र्यांनी अधिकाऱयांना धारेवर धरले. शेतकऱयांच्या खात्यात अद्याप पैसे पोहोचलेले नाहीत अशा सर्वपक्षीय आमदारांच्या तक्रारी आहेत. त्याबद्दल अधिकाऱयांना जाब विचारण्यात आला. त्यावर अधिकारी निरुत्तर झाले. बहुतांश शेतकऱयांच्या खात्यात पैसे पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याचा दावा अधिकाऱयांकडून करण्यात आला. अधिकाऱयांचा तो कावा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या लक्षात येताच आजपर्यंत किती शेतकऱयांच्या खात्यात किती पैसे जमा झाले त्याचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश त्यांनी मुख्य सचिवांना दिले.
शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात
दिवाळीपूर्वी नुकसानभरपाईची रक्कम खात्यात आली तर त्यातून तरी दिवाळीत दिवे लावता येतील अशा आशेवर शेतकरी होते. पण ही जबाबदारी ज्या अधिकाऱयांवर होती ते दिवाळीत सलग पाच दिवस सुट्टीवर होते. परिणामी दिवाळीतही शेतकऱयांना पैसे मिळाले नाहीत आणि त्यांची दिवाळी अंधारात गेली.































































