सगळे आमदार माजलेत असे लोकांना वाटते, फडणवीसांचे हतबल उद्गार

विधान भवनातील लॉबीत टोळीयुद्ध भडकले. भारतीय जनता पक्षाचे गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड या दोन आमदारांच्या कार्यकर्त्यांची हाणामारी झाली. या घटनेने विधीमंडळाच्या अब्रूचे धिंडवडे निघाले. या घटनेचे पडसाद आज सभागृहात उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकारावरून आमदारांचे कान उपटले. पण सगळेच आमदार माजलेत असं लोकांना वाटतं, असे हतबल उद्गारही त्यांच्या तोंडातून निघाले.

गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात अधिवेशन सुरू झाल्यापासून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अगदी विधान भवनाच्या गेटवर एकमेकांना शिविगाळ करेपर्यंत त्यांची मजल गेली, परंतु त्यांना त्यावेळी कुणीही रोखले नाही. मुख्यमंत्र्यांची तीच हतबलता आज विधानसभेत दिसली. हाणामारीच्या घटनेनंतर राज्यात काय चर्चा सुरू आहे त्याची जाणीव त्यांनी आमदारांना करून दिली.

कालच्या घटनेने कोणा एका व्यक्तीची प्रतिष्ठा खराब झालेली नाही. इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा खराब झाली आहे. आज बाहेर ज्या काही शिव्या पडत आहेत त्या एकटय़ा पडळकर किंवा आव्हाडांच्या माणसाला पडत नाही. सर्व आमदारांच्या नावे या ठिकाणी बोलले जाते, हे सगळे आमदार माजले आहेत, असे म्हटले जात असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुनावले. या घटनेचे समर्थन करणे योग्य नाही, असा सल्लाही त्यांनी दिला.

शब्दातून निघणारे विष नागापेक्षा अधिक विषारी

मुख्यमंत्री फडणवीस बोलत असताना सभागृहातील सर्वच आमदार त्यांच्याकडे गंभीर चेहऱयाने पाहत होते. ‘ही विधानसभा आमदारांच्या किंवा मंत्र्यांच्या मालकीची नाही. महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेच्या मालकीची आहे. समाजाला दिशा देणारे काम झाले पाहिजे. पण विचारातून चर्चेतून संदेश जाण्याऐवजी लाथाबुक्क्यांचा संदेश जात असेल तर सर्वांनी चिंतन करण्याची गरज आहे. आपण दोन्ही आमदारांना सांगितले व त्यांनी खेद व्यक्त केला. शब्दातून निघणारे विष हे नागाच्या विषापेक्षा अधिक विषारी असते, असे मुख्यमंत्र्यांनी सुनावले.

त्रिसूत्री ठरवावीच लागेल

आपण माणसं आहोत. राग अनावर होतो. पण आपला चर्चेचा स्थायीभाव हा डिस्कशन असावा. कुणी मीडियासमोर अश्लील बोलत आहे, कुणी अध्यक्षांसमोर अध्यक्ष मॅनेज असल्याचे बोलत आहे. नियमाने या ठिकाणी 45 लक्षवेधी होण्याची गरज आहे. 200 लक्षवेधी घेत आहोत. अशा वेळी जी भाषा आपण वापरतो ती योग्य नाही. तिसरी भाषा कुठल्या वर्गात शिकायची, हे समिती ठरवेल, पण आपण त्रिसूत्री ठरवावी लागेल. संसदीय परंपरा, भाषेचे पालन व सातत्याने संवाद ठेवावा लागेल, याचे भान मुख्यमंत्र्यांनी सदस्यांना करून दिले.

आव्हाड-पडळकरांना सभागृहात खेद व्यक्त करण्याच्या सूचना

आव्हाड आणि पडळकर या दोन आमदारांनी देशमुख व टकले यांना विधान भवनात आणल्याचे समोर आल्याने या दोन्ही आमदारांनी सभागृहात खेद व्यक्त करावा तसेच भविष्यात अशी घटना घडणार नाही याची हमी द्यावी, अशा सूचना अध्यक्ष नार्वेकर यांनी दिल्या. सभागृहाची प्रतिमा बाधित होईल असे वर्तन आमदारांनी सभागृहात आणि सभागृहाबाहेरही घडणार नाही अशी अपेक्षाही त्यांनी सर्व सदस्यांकडून व्यक्त केली. त्यानंतर आव्हाड यांनी आपले म्हणणे मांडले तर पडळकर यांनी माझ्या कार्यकर्त्यांकडून चूक झाली मी आपली माफी मागतो, असे पडळकर म्हणाले.

आतंकवादी घटना घडली तर जबाबदार कोण?

काल जी मारामारी झाली, कुणी कोणासोबत कोण येतंय. याबाबत शिस्त असली पाहिजे. सर्जेराव टकले यावर सहा गुन्हे आहेत. नितीन देशमुखवर आठ गुन्हे आहेत. अशी मंडळी येऊन मारामारी करतात, हे योग्य नाही. काहींनी चूक केली म्हणून सर्वांना शिक्षा नको. योग्य सुरक्षा व्यवस्था उभारा. कुठलाही अभ्यागत येऊ द्या. बिल्ल्याशिवाय तो दिसता कामा नये. एखाद्याने येऊन आतंकवादी घटना केली तर जबाबदारी कोण? आमदार बिल्ला लावून येतात, पण अभ्यागतांच्या गळय़ात किमान एक ओळखपत्र असावे. नाहीतर सुरक्षा रक्षकांनी त्यास बाहेर काढावे, असेही फडणवीस म्हणाले.

दोघा दंगेखोरांविरुद्ध फौजदारी कारवाई!

विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी आज सभागृहाला घटनेची माहिती दिली. विधान भवनाच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱयांच्या अहवालानुसार, मारहाणीच्या घटनेतील नितीन देशमुख यांनी आपण आमदार जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता, तर सर्जेराव टकले यांनी गोपीचंद पडळकर यांचा मावस भाऊ असल्याचे सांगितले आहे. या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्यासह 6 ते 7 अनोळखी व्यक्तींविरुद्ध मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात फौजदारी कारवाई सुरू आहे, असे नार्वेकर यांनी सांगितले.

विधान भवनात यापुढे व्हिजिटर्सना नो एण्ट्री

विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी आव्हाड आणि पडळकर यांना सभागृहात खेद व्यक्त करण्याचे निर्देश देतानाच यापुढे मंत्री, आमदार आणि शासकीय कर्मचारी वगळता कोणालाही विधान भवन परिसरात प्रवेश मिळणार नाही, असा निर्णय घेतला. अभ्यागतांच्या वर्तनाची जबाबदारी संबंधित आमदारांवर निश्चित केली जाईल, अशी तंबीही त्यांनी दिली.