
उत्तराखंडमध्ये पाऊस जास्त झाल्याने चारधाम यात्रा संथ गतीने सुरू आहे. पाऊस आणि भूस्खलनाने महामार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे यात्रा मार्गावरील 5 हजारांहून अधिक हॉटेल्स आणि होमस्टे 90 टक्क्यांपर्यंत रिकामेच आहेत. 10 हजारांहून अधिक टॅक्सींच्या प्रवासाला ब्रेक लागलाय. टॅक्सी भाडे कमी करूनही पर्यटक येत नाहीत.
उत्तराखंडच्या पर्यटन विभागाच्या मते, गेल्या 68 दिवसांत 38 लाख भाविक चारधाममध्ये पोहोचले. गेल्या वर्षी हा आकडा 45 लाख होता. या वेळी मुसळधार पावसामुळे हानी झाली आहे. 21 जणांना जीव गमवावा लागला, 9 जण बेपत्ता आहेत. 80 टक्के रस्ते बंद आहेत.
केदार घाटी हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष प्रेम गोस्वामी म्हणाले की, पूर्वी दररोज 20 ते 30 हजार पर्यटक येत होते. मात्र या आठवडय़ात फक्त 9 हजार पर्यटक आले. तीन हजारांहून अधिक हॉटेल्स, रिसॉर्टस, होमस्टे रिकामे पडले आहेत. दरवर्षी एकूण व्यवसाय 600 कोटी रुपयांपर्यंत असायचा, या वेळी फक्त 30 टक्के करता आला.
बद्रीनाथ हॉटेल असोसिएशनचे राम नारायण यांनी सांगितले की, बद्रीनाथ ते जोशीमठपर्यंत 120 हून अधिक हॉटेल्स आहेत. त्यापैकी फक्त 20 टक्के भरलेली आहेत. उत्तरकाशी हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष शैलेंद्र मातुडा म्हणाले, पावसाळ्याव्यतिरिक्त पर्यटक कमी होण्याची काही इतर कारणे आहेत. जसे की, हेलिकॉप्टर सेवा लवकर बंद होणे. महाकुंभ आणि हिंदुस्थान-पाकिस्तानमधील तणाव.
हरिद्वार–ऋषिकेश रिकामे, केदारनाथमध्ये गर्दी कमी
हरिद्वार-ऋषिकेश रिकामे आहेत. आता कंवर यात्रा सुरू झाल्यानंतर पर्यटकांची संख्या आणखी कमी होईल. चारधाम बस रोटेशन अरेंजमेंट कमिटीचे अध्यक्ष भूपालसिंग नेगी म्हणाले की, या यात्रेत 1700 बसेस आहेत. ज्या 1.55 लाख रुपये आकारत होत्या, त्यापैकी आता फक्त 120 बसेस धावत आहेत. 1 लाख रुपयांपर्यंत भाडे आकारत आहेत. पर्यटन विभागाचे उपसंचालक वायएस गंगवार म्हणाले, पावसाळ्यात पर्यटक कमी येतात, परंतु या वेळी कमी आहेत. यात्रा अजून सुरू आहे.