
सामना प्रतिनिधी । अलिबाग
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे खून खटल्याची सुनावणी सत्र न्यायालयात सुरू आहे. या खून खटल्यातील आरोपींवर आरोप निश्चित करण्याबाबत सोमवारी सुनावणी झाली. आरोपींविरोधात 302, 201, 120 (ब), 218, 417, 465, 468, 471 ही कलमे लावण्याचे न्यायालयाने ठरविले आहे. त्यामुळे या कलमाच्या आधारे आता खटल्याची पुढची सुनावणी होणार आहे. या खटल्याची पुढची सुनावणी 4 जुलै रोजी होणार आहे.
अश्विनी बिंद्रे खून प्रकरणाचा खटला अलिबाग सत्र न्यायाधीश आर. जी. मल्लशेट्टी यांच्या न्यायालयात सुरू आहे. या खटल्यामध्ये आरोपींवर आरोप निश्चित करण्याबाबतचा युक्तिवाद विशेष सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी आधीच्या सुनावणी केला होता. त्यावर सोमवारी न्यायालयाने आरोपींविरुद्ध संघटितपणे कट रचून खून करणे, पुरावा नष्ट करणे, फसवणूक करणे, खोटे पुरावे तयार करणे, पोलिसांची दिशाभूल करून तपासास अडथळा निर्माण करणे या कलमांचा समावेश केला आहे. या खटल्यातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याच्यावतीने त्याचे वकीलांनी जामिनासाठी अर्ज केला होता. तो अर्जही न्यायालयाने निकाली काढला आहे. या खटल्याला विशेष सरकारी वकील, आरोपी पक्षाचे वकील, पोलीस हजर होते. मात्र, आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले नव्हते.



























































