
सामना ऑनलाईन । मुंबई
जागेच्या सुशोभीकरण्याच्या नावाखाली भाजपचे खासदार जागा लाटण्याच्या बेतात आहेत, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. चारकोप येथील कांदळवनासाठी आरक्षित जागेवर भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी गझेबो (वेली शाकारून केलेली बसण्यासाठीची झोपडीसदृश्य वास्तू) बांधल्याचं समोर आलं आहे. हे बांधकाम बेकायदेशीर असल्याची नोटीस म्हाडातर्फे बजावण्यात आली आहे. तसंच, स्थानिक रहिवाशांनी या प्रकरणी शेट्टी यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रारही दाखल केली आहे.
मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, कांदिवली पश्चिमेला चारकोप येथील सेक्टर ८ परिसरातील रिक्रियेशन ग्राऊंडवर शेट्टींनी हा गझेबो उभारण्याचा घाट घातला आहे. हे रिक्रियेशन ग्राऊंड येथील कांदळवनांसाठी संरक्षित परिसरात येतं. २००६मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कांदळवन परिसरातील ५० मीटर जागेवर कोणतंही बांधकाम हे बेकायदेशीर आहे. मात्र, न्यायालयाचा हा आदेश धाब्यावर बसवून शेट्टी यांनी हे बांधकाम केलं असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. या गझेबो बांधकामाच्या निमित्ताने मोकळ्या जागा लाटण्याचा शेट्टी यांचा हेतू असल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे.
या खेरीज, या जागेवर अतिक्रमण करण्याचा शेट्टी यांचा हा सहावा प्रयत्न आहे, ही बाबही समोर आली आहे. गोपाळ शेट्टी हे २०१३पासून हा प्रयत्न करत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. शेट्टी यांच्या अतिक्रमणाची माहिती मिळताच म्हाडाकडून हे बांधकाम त्वरित थांबवण्याचे आदेश आले आहेत. दुसरीकडे शेट्टी हे आपण या कामासाठी म्हाडा, उच्च न्यायालय आणि इतर संबंधित संस्थांकडून परवानगी मिळवली असल्याचा दावा करत आहेत.
summary- charkop citizens against mp gopal shetty
























































