चारकोप ‘म्हाडा’वासीयांच्या समस्या सुटणार; आदित्य ठाकरे यांच्याकडून शिष्टमंडळाला आश्वासन

908

चारकोपमधील प्रबोधनकार ठाकरे म्हाडा वसाहतींमधील सहकारी गृहनिर्माण सोसायटय़ांना भुईभाडे आणि बिनशेतीसाराच्या नावाखाली प्रशासनाकडून व्याजासह लाखो रुपयांचा भरमसाट दंड आकारला जात आहे. शिवाय रहिवाशांच्या अनेक मागण्याही प्रलंबित आहेत. याबाबत शेकडो संस्थांच्या वतीने पर्यटनमंत्री आणि उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. यावेळी चारकोप ‘म्हाडा’ वसाहतींमधील रहिवाशांच्या समस्या दूर करण्याचे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले.

चारकोप परिसरात ‘म्हाडा’ प्राधिकरणाच्या जमिनीवरील वसाहतींच्या सुमारे 950 संस्था आहेत. 1988 पासून संस्थांना म्हाडाकडून भाडेतत्त्वावर मिळालेल्या जमिनीवर या सोसायटय़ा उभ्या आहेत. या नोंदणीकृत संस्थांना पहिली दोन वर्षे देयकाची पत्रे आली, मात्र त्यानंतर 2019पर्यंत म्हाडाकडून कोणतीही देयके आली नाहीत. असे असताना अनेक सभासदांनी म्हाडाकडे स्वतःहून रक्कम भरली. मात्र आता 16 टक्के दंड आकारण्यात येत आहे. या दंडाची रक्कम तब्बल तीन ते चार लाखांत जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांना याचा आर्थिक भुर्दंड पडत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नगरसेविका शुभदा गुढेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी विभाग संघटक मनाली चौकीदार, संतोष राणे, राजू खान, राजन निकम, शाखाप्रमुख निखिल गुढेकर यांच्यासह रहिवासी आदी उपस्थित होते.

मोकळ्या भूखंडांचा प्रश्न सोडवा!

प्रभाग क्र. 19 मध्ये म्हाडा प्राधिकरणाच्या जमिनीवर एअर इंडिया, इंडियन एअरलाइन्स, नाबार्ड या केंद्र सरकारच्या आस्थापनांचे भूखंड आहेत. सुमारे 30 वर्षांपूर्वी हे भूखंड निवासी सदनिका बांधण्यासाठी वितरित झाले असताना अद्याप यावर कोणतेही बांधकाम करण्यात आलेले नाही. त्यामुळे या भूखंडांवर सध्या घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या