
रविवारी पहाटे चारकोपच्या साईबाबा मंदिरात आग लागली नसून ती लावण्यात आली होती. नेहमीच्या मारहाणीला कंटाळून दोघांना धडा शिकवण्यासाठी मंदिरात पेट्रोल टाकtन आग लावली गेली. तिहेरी हत्या प्रकरणी चारकोप पोलिसांनी भावेश चांदोरकरसह एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे.
कांदिवलीच्या चारकोप परिसरात साईबाबा मंदिर आहे. शनिवारी रात्री मनू राधेशाम गुप्ता, सुभाष खोडे, युवराज पवार हे तिघे झोपायला गेले होते. रविवारी पहाटे मंदिरात लागलेल्या आगीत तिघांचा मृत्यू झाला होता.
आगीच्या घटनेनंतर घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबचे पथक गेले होते. ती आग शॉकसर्किटमुळे लागली नसल्याचे चारकोप पोलिसांना सांगण्यात आले. त्यानंतर चारकोप पोलिसांनी तपास सुरु केला. तपास सुरु असतानाच पोलिसांना भावेश आणि युवराजमधील पूर्वीच्या वादाची माहिती मिळाली.
दीड वर्षांपूर्वी भावेश आणि युवराजचा क्रिकेटवरून वाद झाला होता. तेव्हा युवराजने भावेशला मारहाण केली होती. जेव्हा-जेव्हा भावेश भेटेल तेव्हा युवराज हा त्याला मारहाण करायचा. तर सुभाष हा युवराजला मदत करायचा. घटनेच्या दोन दिवस अगोदर युवराजने भावेशला सिगरेट आणण्यासाठी पाठवले. तेव्हा भावेशने नकार दिला. नकार दिल्यावर युवराजने भावेशला मारहाण केली. त्याचा राग भावेशच्या डोक्यात होता.
आगीच्या घटनेनंतर भावेशला घरी नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. उत्तर प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. त्यानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र सातपुते, पोलीस निरीक्षक घनश्याम नायर, सहायक निरीक्षक विक्रम बाबर, वाघमारे आदींच्या पथकाने तपास सुरु केला. भावेश हा संभाजीनगर येथे पळून गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांचे पथक संभाजीनगर येथे गेले. तेथून भावेशला ताब्यात घेतले.
दोन दिवसांपूर्वी रचला कट
युवराज आणि सुभाषला धडा शिकवण्यासाठी भावेशने कट रचला. त्यासाठी भावेशने समतानगर येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलाची मदत घेतली. शनिवारी सायंकाळी युवराज आणि सुभाष हे दोघे प्रचंड दारू प्यायले. ते रात्री झोपण्यासाठी मंदिरात गेले. ते मंदिरात झोपल्याची खात्री झाल्यावर भावेशने स्वतःच्या मोटारसायकलमधून पेट्रोल काढले. पहाटे भावेशने मंदिरात पेट्रोल टाकले.
पेट्रोल टाकल्याने लागलेल्या आगीत मंदिरातील कुलरचा स्फोट झाला. आगीनंतर भावेशला त्या मुलाला समतानगर येथे सोडले. त्यानंतर तो घरी येऊन झोपला. पहाटे आगीत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समजताच भावेशने मावशीकडे जात असल्याचे सांगून तो घराबाहेर पडला. रिक्षाने तो बोरिवली येथे आला. तेथून बसने संभाजीनगर येथे गेला होता. मयत मोनू हा लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच मंदिरात झोपायला आला होता.



























































