
डोंबिवलीच्या चार्मी पासड या 22 वर्षीय तरुणीचा लोकलच्या गर्दीने बळी घेतल्यानंतर मध्य रेल्वेच्या जिवघेण्या गर्दीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नव्या फेऱ्या वाढवण्यास नसलेला वाव, प्रचंड रखडलेला पाचवा आणि सहावा मार्ग, पंधरा डब्यांच्या लोकल चालवण्यात येत असलेल्या तांत्रिक अडचणी त्यामुळे या गर्दीवर उतारा कसा मिळवायचा यावर पुन्हा एकदा चर्चेला तोंड फुटले आहे. त्यामुळे कल्याणच्या प्रवाशांना मेल-एक्सप्रेसमध्ये थोडेफार भाडे आकारून प्रवासाला परवानगी द्यावी, अशी मागणी पुन्हा होत आहे.
सध्या मध्य रेल्वेवर दिवसभरातून एकूण 1774 लोकल फेऱ्या चालवण्यात येतात. त्यात डोंबिवलीतून सुटणाऱ्या 32 ‘डोंबिवली लोकल’ असल्या तरी सकाळच्या गर्दीच्या वेळेत केवळ पाच ते सहा डोंबिवली लोकल आहेत. त्यात पंधरा डब्यांची डोंबिवली आणि कल्याण लोकलचा समावेश असला तरी तो पुरेसा नसल्याचे प्रवाशी संघटनांचे म्हणणे आहे. मध्य रेल्वेवर पंधरा डब्याच्या दोन लोकल असून त्याच्या दिवसभरात 22 फेऱ्या होतात. तर कल्याणच्या पुढेही पंधरा डब्याच्या लोकल चालवण्याची योजना असून लवकरच त्याला अंतिम स्वरूप येणार असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.
























































