आठवणीतला फराळ

5189

>> शेफ विष्णू मनोहर

नेहमी एखाद्या मान्यवरासोबत असणारी माझी लंचडेट आज दिवाळीनिमित्त तुम्हा वाचकांसोबत.

आजकाल लोकांची वर्षभरच दिवाळी असते असं म्हणायला काही हरकत नाही. पूर्वी दिवाळीची चाहूल महिन्यापूर्वीच लागायची. कधीतरी दुपारी अचानक भाजणीचं धान्य भाजतानाचा वास यायचा. चकलीची भाजणी झाली की, नंबर यायचा लाडवाचा, नंतर चिवडय़ाचा व सर्वात शेवटी चकल्यांचा. तोपर्यंत आमची परीक्षाही आटोपत आलेली असायची. परीक्षा संपली त्या दिवशीपासूनच आम्ही दिवाळीचा किल्ला करायला सुरुवात करायचो व किल्ला करताना चोरून दिवाळीचा फराळ तोंडात टाकायचो. मला आठवतं, दिवाळीच्या दिवसांत अभ्यंगस्नान आटोपल्यावर आम्ही गरम गरम शिरा, त्याबरोबर जुन्या लिंबाचं लोणचं व गरमागरम चकली आणि मलईचं दही खायला घ्यायचो.

 पूर्वी जास्तीत जास्त लोक चाळी किंवा वाडय़ातच राहायचे व दिवाळीचा फराळ तीन-चार कुटुंबे मिळून करायचे. कुठले पदार्थ आपण स्वत- बनवायचे व कुठले आचाऱयाकडून बनवून घ्यायचे यावर चर्चा व्हायची. पांढरंशुभ्र धोतर, शर्ट, खांद्यावर पंचा घातलेले पंडित हातात झारे-सराटे घेऊन दरवाजातून आरोळी ठोकायचे, ‘‘बाई, हम आ गये!’’ मग घरच्या बायकांची लगबग सुरू व्हायची. त्यांची लगबग पाहून या पंडित महाशयांना अजून ताव यायचा. ‘‘ये…लावो…वो…लावो, ऐसा करो…वैसा करो….’’ असे फर्मान सोडीत पंडित लोक शेखी मिरवायचे आणि मग बायकांची धावपळ सुरू व्हायची. कसनुसं हसत त्याच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यात त्यांचा जीव जायचा,  काही जुने फराळाचे पदार्थ हल्ली दिसत नाहीत.  आपण जे लोप पावलेले पदार्थ आहेत, त्यांच्याकडे लक्ष देऊया.

कडबोळी

साहित्य – 1 वाटी चण्याची डाळ, पाव वाटी तांदूळ, पाव वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, 2 चमचे तीळ, 1-1 चमचा धने-जिरे, तिखट, चवीनुसार हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचा आमचूर पावडर.

कृती – सर्व डाळी व तांदूळ मंद आचेवर व्यवस्थित भाजून दळून घ्या. नंतर त्यात चवीनुसार हळद, तिखट, मीठ, आमचूर पावडर घाला. मंद त्याचा कडबोळी करून मंद आचेवर तळा.

मधाचे चिरोटे

साहित्य – 2 वाटय़ा मैदा,अर्धी वाटी तांदळाचे पीठ, 2 चमचे लोणे, चवीनुसार मीठ, अर्धी वाटी मध, 4 चमचे फाईन शुगर, 4 चमचे पिस्ता किंवा बदाम, 2 वाटय़ा साखर, तळायला तूप.

कृती – मैद्यामध्ये मीठ घालून भिजवून घ्या. साखरेचा एकतारी पाक तयार करून घ्या. तांदळाच्या पिठात मैदा, लोणी मिसळून त्याचा साटा तयार करा. मैद्याची लांब चौकोनी पोळी लाटून त्यावर साटा लावा व ते बुकफोल्ड करा. 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवून परत ही प्रोसेस करा. त्यानंतर याची चौकोनी पोळी लाटून त्याचे चौकोनी तुकडे करा. चारही कोपरे मधोमध आणून दाबून टाका. मंद आचेवर तळून साखरेच्या पाकात बुडवून बाहेर काढा. मधोमध बदामाचे काप लावून खायला द्या.

राघवदास लाडू

साहित्य – 1 वाटी गव्हाचा मध्यम रवा, 1 वाटी साखर, अर्धी वाटी ओल्या नारळ, चार चमचे बेदाणे,  1 चमचा वेलचीपूड, पाव वाटी तूप.

कृती – एक वाटी गव्हाचा रवा तुपावर खमंग भाजून घ्यावा. त्यात अर्धी वाटी पांढरे खोबरे घालून पुन्हा चांगला परतावा. गॅस बंद करावा. खोबऱयाचा रंग बदलू देऊ नये. नंतर एका पातेल्यात पाऊण वाटी साखर व पाणी घालून कच्चा पाक भाजलेला रवा व वेलचीपूड घालून चांगले ढवळून ठेवावे. मिश्रण थंड झाल्यावर बेदाणे लावून लाडू वळावेत. हे लाडू जेवणाच्या वेळी वाढायचे असल्यामुळे कच्च्या पाकात जास्त रुचकर लागतात.

गोंदाचे अनारसे

साहित्य – 1 वाटी पांढरा गोंद (कुटून त्याचा रवा करून घ्यावा), 1 वाटी रवा, चिमूटभर खाण्याचा सोडा, 2 चमचे दही, 4 चमचे खसखस, तूप तळायला, 1 वाटी साखरेचा घट्ट पाक, 4 चमचे दूध.

कृती – सर्वप्रथम पांढरा गोंद कुटून त्याचा रवा काढून घ्या. त्यामध्ये गव्हाचा रवा, सोडा मिसळून घ्या. नंतर एक चमचा दही व थोडे दूध घालून त्याचा गोळा मळून घ्या. नंतर त्यातील लिंबाएवढा गोळा घेऊन त्याची पुरी लाटून ती खसखशीवर थापा. खसखस लावलेली बाजू वर ठेवून मंद आचेवर अनारसे तळून घ्या. अनारसे तळून झाल्यानंतर त्यावर एक-एक चमचा साखरेचा पाक घाला.

दराब्याचे लाडू

साहित्य – 1 किलो गहू, पाऊण किलो तूप, 1किलो पिठी साखर,  1चमचा वेलची पावडर, अर्धा नग जायफळ.

कृती – गहू चार ते पाच तास भिजत ठेवून चाळणीमध्ये निथळू द्यावे. नंतर ते कपडय़ात बांधून रात्रभर ठेवा. नंतर त्याचा रवा दळून आणा. नंतर दोन चाळण्यांनी चाळून त्याचा कोंडा वेगळा करून घ्या. उरलेल्या पिठात तूप घालून लालसर भाजा. थंड करून परातीमध्ये भरपूर फेटा. नंतर त्यात पिठी साखर मिसळून थोडेसे फेटून लाडू वळा.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या