
सामना प्रतिनिधी, मुंबई
गुणवत्ता असूनही हिंदुस्थानी क्रिकेट संघाची कॅप घालायला मिळाली नाही, या गोष्टीचे शल्य विषाच्या रूपात मनात कधीच साठवून ठेवले नाही. पण आज तुम्ही मोठय़ा संख्येने माझ्यावरील प्रेमापोटी हा सोहळा केलात हेच खूप मोठे समाधान आहे, असे सांगत ज्येष्ठ रणजीपटू पद्माकर ऊर्फ पॅडी शिवलकर यांनी आपल्या सुमारे तीन दशकांच्या क्रिकेट कारकीर्दीचे आणि त्यावरील ‘हा चेंडू दैवगतीचा’ पुस्तकाचे मर्म उलगडले.
पद्माकर शिवलकर यांच्या ‘हा चेंडू दैवगतीचा’ या चरित्र पुस्तकाचे प्रकाशन आज रवींद्र नाटय़मंदिरातील मिनी थिएटरमध्ये येथे झाले. पुस्तकाचे संकलन आणि लेखन सहाय्य अरुण घाडीगावकर यांनी केले आहे. आनंदयात्री, मुंबई, ऑब्लिगॅटो इव्हेंटस्, डिंपल पब्लिकेशन यांच्या वतीने हा प्रकाशन सोहळा रंगला. यावेळी अभिनेते शिवाजी साटम, दीपक करंजीकर, प्रदीप वेलणकर, चंदू पाटणकर, ज्येष्ठ क्रिकेटपटू सुधीर नाईक, गोलंदाज राजू कुलकर्णी, विलास गोडबोले, उमेश कुलकर्णी, नाटय़लेखक अशोक समेळ, संगीतकार अशोक पत्की, समीक्षक द्वारकानाथ संझगिरी, प्रकाशक कौतुक मुळे आणि किरण वालावलकर आदी उपस्थित होते.
पॅडी बिशनपेक्षा मोठा गोलंदाज!
पॅडी म्हणजे बिशनसिंग बेदीपेक्षा खूप मोठे गोलंदाज होते. मुंबईच्या क्रिकेटसाठी त्यांचा हवा तसा उपयोग करून घेता आला नाही, अशी खंत विलास गोडबोले यांनी व्यक्त केली. गोडबोले यांच्या वक्तव्याचा धागा पकडत गोलंदाज राजू कुळकर्णी यांनी लेफ्ट आर्म स्पिनिंग आणि अन्य गोलंदाजीच्या प्रशिक्षणासाठी पॅडी आणि त्यांच्याप्रमाणे अन्य ज्येष्ठ क्रिकेटपटूंना लवकर आमंत्रित करू असे आश्वासन याप्रसंगी दिले.
























































