पर्यटकांना साद घालतोय चेंदवण – निरूखेवाडीचा नयनरम्य धबधबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
चेंदवण - निरूखेवाडी येथील फेसाळणारा धबधबा. (छाया : काशिराम गायकवाड)

सामना प्रतिनिधी । कुडाळ

कुडाळ तालुक्यातील चेंदवण – निरूखेवाडी येथील नयनरम्य धबधबा पर्यटकांना खुणावत आहे. दुर्लक्षित असलेल्या या धबधब्याचा पर्यटनात्मकदृष्ट्या विकास होणे गरजेचे आहे.कोकणात अनेक धबधबे पर्यटकांना खुणावत आहेत. मात्र या धबधब्यांच्या पर्यटनदृष्ट्या विकास होत नसल्याने तसेच प्रचार होत नसल्याने पर्यटकांचे या धबधब्यांकडे दुर्लक्ष होत आहे.

कुडाळ तालुक्यातील चेंदवण निरूखेवाडी येथे असाच एक नयनरम्य धबधबा पर्यटकांना खुणावत आहे. जंगल परिसरात असलेला हा धबधबा पावसाळ्यात सुरू झाल्यानंतर तो डिसेंबर पर्यंत तसाच सुरू असतो. गर्द वनराईत पांढ-या शुभ्र फेसाळणा-या लाटांचे मनमोहक दृश्य येथे पाहावयास मिळते. मात्र या धबधब्याचा पर्यटनदृष्ट्या विकास होणे गरजेचे आहे. त्यामुळे गावाच्या सौंदर्यात मोठी भर पडणार आहे. शिवाय स्थानिकांना रोजगारही प्राप्त होण्यास मदत होणार आहे.

या ठिकाणी आवश्यक मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध झाल्यानंतर पर्यटकांची संख्या वाढणार आहे. चेंदवण – वालावल येथील श्री देवी माऊली मंदिराकडून पुढे परूळे रस्त्याने जाताना पाच पांडवांच्या विहीरीच्या जवळपास उजव्या बाजूस निरूखेवाडीत जाणारा कच्चा रस्ता आहे. या रस्त्यावरून पुढे गेल्यावर दिड कि.मी. अंतराची पायवाट आहे. या पायवाटेने पुढे गेल्यावर हा गर्द वनराईत फेसाळणारा धबधबा नजरेस पडतो. या धबधब्याचा पर्यटन दृष्ट्या विकास होण्यासाठी शासनस्तरावरून निधी उपलब्ध देण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे. या धबधबा परिसरात स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने साफसफाई मोहीम राबविण्यात येणार असल्याचे स्थानिक ग्रामस्थ भूपेश चेंदवणकर यांनी सांगितले.