धोनीच कर्णधारपदी कायम राहणार, सीएसकेचे मालक एन. श्रीनिवासन यांच्याकडून चर्चेला पूर्णविराम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महेंद्रसिंग धोनीचे वय झालेय. तो आता थकलाय. आगामी आयपीएलमध्ये त्याची खेळण्याची शक्यता दिसत नाही. अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र यापुढेही धोनीच आमच्या संघाचा कर्णधार राहणार आहे, असे स्पष्ट करून चेन्नई सुपरकिंग्ज (सीएसके) संघाचे मालक एन. श्रीनिवासन यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.

‘आयपीएल’च्या 13 व्या सत्रात महेंद्रसिंग धोनीला व त्याच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. ‘आयपीएल’च्या इतिहासात हा संघ प्रथमच साखळी फेरीत गारद झाला. त्यामुळे धोनी आता निवृत्त होणार अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली होती. मात्र सीएसके संघाचे मालक एन. श्रीनिवासन यांनी धोनीसंदर्भात एक महत्त्वाची घोषणा केली आहे. ते म्हणाले, ‘धोनी आणि चेन्नई संघाचा यंदाचा हंगाम फारसा चांगला गेला नाही. आमच्यासाठी एक वर्ष वाईट ठरलं, मात्र एकदा हरलो म्हणून काय झाले? त्यामुळे धोनी संघाचा कर्णधार होता आणि तोच यापुढेही संघाचे नेतृत्व करत राहील, अशी आपली भूमिका एन. श्रीनिवासन यांनी स्पष्ट केली.

ऋतुराजमध्ये कोहलीची झलक

‘ऋतुराज गायकवाड एक प्रतिभावान क्रिकेटपटू आहे. मात्र कोरोनाच्या आजारातून सावरण्यासाठी त्याला थोडासा उशीर लागला. फाफ डु प्लेसिसने म्हटल्याप्रमाणे त्याच्यात तरुणपणी खेळणाऱया विराट कोहलीची झलक दिसतेय. हिंदुस्थानला एक गुणवान खेळाडू मिळाला आहे. ऋतुराज नक्कीच कोहलीसारखा यशस्वी होईल.’  – एन. श्रीनिवासन