
चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) संघाचा यंदाचा प्रवास अजूनही रुळावर आलेला नाही. महेंद्रसिंह धोनीच्या अनुपस्थितीत संघ चाचपडताना दिसत असून, सलग तीन पराभवांनंतर पहिल्या विजयासाठी चेन्नई आतुर झालाय. मात्र, समोर तुफानी फॉर्मात असलेला दिल्ली पॅपिटल्स संघ उभा आहे. त्यामुळे त्यांचा विजयशोध पूर्ण होतो, की पराभवाचा चौकार सहन करावा लागतो हे शनिवारीच कळू शकेल.
दिल्लीविरुद्ध जिंकायचे असेल तर कर्णधार ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन आणि आयुष म्हात्रे यांच्या बॅटमधून धावांचा वर्षाव होणे अत्यावश्यक आहे. आतापर्यंत सीएसकेची फलंदाजी अपयशी ठरली असून, या सामन्यात ती उंच भरारी घेणार का याकडे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे डेवाल्ड ब्रेविसच्या अनुपस्थितीमुळे संघाचा तोल ढासळला होता. उद्या त्याच्या पुनरागमनाची शक्यता असल्याने चेन्नईला बळ मिळू शकते. मात्र, धोनी खेळणार की नाही याबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे. धोनी अद्याप एकही सामना खेळलेला नाही.
के. एल. राहुल जबरदस्त फॉर्मात आहे. त्याच्या 92 धावांच्या खेळीने दिल्लीसाठी मोठा इशारा दिलाय. गेल्या सामन्यात एका धावेने पराभव पत्करलेल्या दिल्लीचा संघ आता अधिक आक्रमक होण्याच्या तयारीत आहे. गेल्या सामन्यात 210 धावांचे लक्ष्य सहज पार झाले होते. त्यामुळे गोलंदाजांनाही धार दाखवावी लागणार आहे. राहुलच्या वादळाला रोखणे हे चेन्नईसमोरचे सर्वात मोठे आव्हान असेल.



























































