
आपल्या देशात कलाकारांची कमी नाही. एकापेक्षा एक सरस कलाकार आहेत. कुणी तांदळाच्या दाण्यावर नाव कोरतं, तर कुणी वाळूवर दर्जेदार कलाकृती रेखाटतं. यात आणखी एका अवलियाची भर पडली आहे. तो पेन्सिलीच्या टोकावर कलाकृती साकारतो. तुमचं नाव असू दे किंवा ते एखादं इंग्रजी अक्षर… तो पेन्सिलीच्या टोकावर काय करत नाही ते विचारा. राजकुमार असे या चेन्नईतील कलाकाराचे नाव आहे.
आर्किटेक्टरचे शिक्षण घेतलेला राजकुमार नोकरी सांभाळून पेन्सिल लीड आर्टचे काम करतो. एकेकाळी जी कला त्याची पॅशन होती ती आज त्याचा पार्टटाईम जॉब बनली आहे. यू-टय़ूबवर व्हिडियो बघून 26 वर्षीय राजकुमार ही कला शिकला. लीड आर्ट ही एक प्रकारची थेरपी असल्याचे राजकुमार सांगतो.
राजकुमारने सुरुवातीला सोप्या कलाकृती बनवायला सुरुवात केली. उदाहरणार्थ पेन्सिलीच्या टोकावर आपलं नाव लिहिणं, क्युब बनवणे. त्यानंतर हळूहळू तो कठीण कलाकृतींकडे वळला. भगवान बुद्धाची प्रतिमा, नटराज, वर्ल्डकप, नृत्य सम्राट अशा सुमारे 400 कलाकृती साकारल्या.
n पेन्सिल लीड आर्टवर्कसाठी राजकुमार 10बी, 12बी, आणि ग्राफाईट पेन्सिल आदींचा वापर करतो. प्रत्येक पेन्सिलच्या टोकाची जाडी वेगवेगळी असते. 0.5 मिमी ते 4 मिमीच्या टोकावर तो कलाकृती बनवतो. एक कलाकृती तयार करायला अर्धा तास ते सात-आठ तास एवढा कालावधी लागतो.
























































