
मी नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री नसलो, तरी मंत्री म्हणून जिल्ह्यातील कामकाजाची माहिती घेण्याचा मला अधिकार आहे. सिंहस्थ कामांच्या नियोजनाबाबतीत मी अनभिज्ञ होतो, म्हणून आज ही आढावा बैठक घेतली, असे स्पष्ट करीत मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपाचे कुंभमेळा मंत्री गिरीष महाजन यांना शह दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी मंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासकीय अधिकाऱयांची बैठक घेतली. सिंहस्थ कुंभमेळा, औद्योगिक विकास, त्र्यंबकेश्वर, येवल्यासह जिह्यातील अन्य विकासकामांचाही आढावा घेतला. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पालकमंत्री पदासाठी इच्छुक असलेल्या छगन भुजबळ यांनी 15 ऑगस्टला ध्वजारोहणासाठी गोंदिया येथे जाण्यास स्पष्ट नकार देऊन नाशिकमध्ये हजेरी लावली होती. यानंतर त्यांनी आज घेतलेल्या या बैठकीकडे राजकीय दृष्टीने विशेषतः भाजपाला शह देण्याच्या दृष्टीने पाहिले जात आहे.