ओबीसी आरक्षणावर गदा येणार असेल तर लढावे लागेल, छगन भुजबळ यांनी दिला इशारा

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात आहे. या मागणीवर ओबीसी नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अखेर मौन सोडले आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी मांडली. जर ओबीसी समाजाच्या आरक्षणावर गदा येणार असेल तर लढावे लागेल, असा इशारा भुजबळ यांनी यावेळी दिला.


राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाला ओबीसीतून 5 टक्के आरक्षण द्या, अशी मागणी करीत आहेत. इतकेच नव्हे तर मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करा, असे देखील बोलले जात आहे. या सगळ्यांमुळे संघर्ष निर्माण होईल, तसे वातावरण देखील असल्याचे मत यावेळी छगन भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केले.

मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नव्हता. त्यांना त्यांचे आरक्षण मिळाले पाहिजे, पण यासाठी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. मंत्रालयात झारीतले शुक्राचार्य खूप आहेत. म्हणून अनेक अडचणी येत असल्याचे टीका देखील त्यांनी यावेळी केली.

आपली प्रतिक्रिया द्या