
सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत नाही, तर दुर्धर आजाराने झाला, असे आकांडतांडव करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तोंडावर आपटले आहेत. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाने आठ दिवसांत मारकुटय़ा पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या वर्षी 10 डिसेंबर रोजी परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली. या घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले. त्यानंतर परभणी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून अनेकांना ताब्यात घेतले. यात कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी यांचाही समावेश होता. पोलीस कोठडीत अमानुष मारहाण करण्यात आल्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. मात्र पोलिसांनी मारहाण झाली नसल्याचा दावा केला. परंतु शवविच्छेदन अहवालाने पोलिसांचे बिंग पह्डले. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंगावर बेदम मारहाणीमुळे अनेक जखमा झाल्याचा स्पष्ट उल्लेख शवविच्छेदन अहवालात करण्यात आला. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात निवेदन करताना मारकुटय़ा पोलिसांना पाठीशी घातले आणि सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू श्वसनाच्या दुर्धर आजारामुळे झाला असल्याचे चमत्कारिक उत्तर दिले. या प्रकरणाची न्यायालयीन आणि एसआयटी अशा दोन्ही चौकशा होणार असल्याचे जाहीर करतानाच त्यांनी वादग्रस्त पोलीस अधिकारी अशोक घोरबांड यांचे निलंबनही केले.
पोलीस कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी त्यांची आई विजया सूर्यवंशी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. विभा पंकणवाडी आणि न्या. संजय देशमुख यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी विजया सूर्यवंशी यांची बाजू मांडताना अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत 72 पोलिसांवर ठपका ठेवण्यात आल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. शवविच्छेदन अहवालात करण्यात आलेल्या जखमांचा उल्लेखही त्यांनी खंडपीठासमोर ठेवला. सरकार पक्षाच्या वतीने अमरजितसिंग गिरासे यांनी बाजू मांडली. उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर खंडपीठाने या प्रकरणात संबंधित पोलिसांच्या विरोधात आठ दिवसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या याचिकेवर पुढील सुनावणी 30 जुलै रोजी होणार आहे.

































































