
महापालिका निवडणुकीत ११५ नगरसेवक निवडून आले. नवनिर्वाचित नगरसेवक अजूनही हारतुरे, सत्कार स्वीकारण्यातच मग्न असताना १८ नगरसेवकांच्या तक्रारी विरोधकांनी महापालिका प्रशासनाकडे केल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक तक्रारी एमआयएम नगरसेवकांच्या विरोधात आहेत. तीन अपत्य, खोटे शपथपत्र, अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण केल्याच्या, खोटे जात प्रमाणपत्र जोडल्याच्या तक्रारी आहेत. प्रशासन या तक्रारींची शहानिशा करीत आहे. तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्यास संबंधित नगरसेवकावर अपात्रतेची कारवाई केली जाणार आहे.
मनपाची निवडणूक १५ जानेवारी रोजी घेण्यात आली. १६ जानेवारीला निकाल घोषित झाले. निवडून आलेल्या नगरसेवकांची ‘कुंडली’ गोळा करण्यास विरोधकांनी दुसऱ्या दिवशीपासून सुरूवात केली. ही माहिती गोळा करणाऱ्या एका विरोधकाला बेदम मारहाण केल्याची घटनाही बीड बायपासवर घडली. नंतर विरोधक आणि नगरसेवक यांच्यात समझोताही झाला. राजकीय पक्ष एखाद्या उमेदवाराला उमेदवारी देण्यापूर्वीच बात प्रमाणपत्र, तीन अपत्य, अतिक्रमण आदी मुद्यांवर चौकशी करतात. शहरात एका राजकीय पक्षाने यासंदर्भात सखोल चौकशीच केली नाही. उमेदवाराची कोणतीही पार्श्वभूमी तपासली गेली नाही. त्याचे परिणाम आता समोर येत आहेत.
मनपाच्या निवडणूक विभागाकडे मंगळवारपर्यंत एकूण १८ नगरसेवकांच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्या. प्रत्येक तक्रारीची सखोल चौकशी केली जाणार आहे. चौकशी अहवाल आयुक्तांकडे सादर केला जाईल. त्यानंतर आयुक्त यासंदर्भात अंतिम निर्णय घेतील, असेही या विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच नवनिर्वाचित नगरसेवकांच्या विरोधात एवढ्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या आहेत. २०१६ मध्ये फक्त बुड्डीलेन वॉर्डात पोटनिवडणूक घ्यावी लागली होती.
तथ्य असेल तर अपात्रतेची कारवाई
नवनिर्वाचित नगरसेवकांच्या विरोधात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची अगोदर शहानिशा केली जाईल. तपासणी केली जाईल. कलम १० आणि १२ अंतर्गत संबंधित नगरसेवक उल्लंघन करीत असल्याचे लक्षात येत असेल तर अपात्रतेची कारवाई केली जाणार आहे. प्राप्त तक्रारींमध्ये दोनपेक्षा अधिक अपत्य, अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण, शपथपत्रात संपत्ती लपविली, खोटी माहिती दिली, अशा तक्रारी आहेत.
-जी. श्रीकांत, मनपा आयुक्त






























































