
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीप्रमाणे जन्मोत्सव शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रचंड जल्लोषात साजरा झाला. विविध पारंपरिक कार्यक्रम, किल्ल्याला फुलांची सजावट, ढोल-ताशांचा गजर अशा जल्लोषी वातावरणामुळे विमानतळावर जणू शिवसृष्टी अवतरली होती. संपूर्ण दिवसभर बहुसंख्येने हजेरी लावलेल्या शिवसैनिक, शिवप्रेमींनी ‘जय भवानी, जय शिवाजी’ जयघोष केल्यामुळे विमानतळ परिसर दुमदूमून गेला. भारतीय कामगार सेना विमानतळ युनिटतर्फे भव्यदिव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई विमानतळावरील शिवरायांच्या भव्य पुतळय़ाला पुष्पहार अर्पण केला. ढोल-ताशांच्या गजरात आणि आधुनिक पद्धतीने गुलाबाचा पुष्पहार शिवरायांच्या पुतळय़ाला अर्पण करून महाराष्ट्राच्या देदीप्यमान वारशाला वंदन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते, आमदार अॅड. अनिल परब, उपनेते आमदार सचिन अहिर, आमदार हारून खान, मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, नगरसेविका अबोली खाडये, नगरसेवक प्रमोद सावंत, विधानसभा संघटक मनोहर पांचाळ, भारतीय कामगार सेनेचे कार्याध्यक्ष अजित साळवी, उपाध्यक्ष गुरुनाथ खोत, सरचिटणीस संतोष चाळके, संयुक्त सरचिटणीस दिलीप जाधव, मुंबई विमानतळ प्रशासनाचे अधिकारी यांच्यासह शिवसेनेचे विविध स्तरांवरील पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. सर्व शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होत जयघोष केला.
उद्धव ठाकरे यांना शिवरायांची मूर्ती भेट
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भारतीय कामगार सेनेच्या वतीने हत्तीवर स्वार झालेले छत्रपती शिवाजी महाराज यांची सुंदर मूर्ती भेट म्हणून देण्यात आली. याप्रसंगी चिटणीस संतोष कदम, मयूर वनकर, सूर्यकांत पाटील, राजा ठाणगे, पोपट बेदरकर, विजय दळवी, सहचिटणीस नीलेश ठाणगे, जगदीश निकम, मिलिंद तावडे, विजय शिर्पे, संजीव राऊत, दिनेश पाटील, दिनेश परब, विजय तावडे, सुजित कारेकर, वसंत गुरव तसेच सर्व कमिटी सदस्य कार्यकारिणी सदस्य व कामगार मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय शंकर कदम यांनी केले.

























































