छत्तीसगडमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका काँग्रेस नेत्याने आपल्या कुटुंबासोबत आत्महत्या केल्याची घटना येथील जांजगीर-चांपा जिल्ह्यात घडली आहे. काँग्रेसच्या नेत्याने पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या केली. यामध्ये मोठ्या मुलाचा घरीच मृत्यू झाला असून नेत्यासह पत्नी आणि छोट्या मुलाची प्रकृती गंभीर होती. त्यांना गंभीर अवस्थेत बिलासपुरच्या सिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रविवारी सकाळी उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला.
काँग्रेस नेते पंचराम यादव (66), पत्नी दिनेश नंदनी (55), नीरज यादव ( 28) आणि सूरज यादव(25) अशी मृतांची नावे आहेत. या सर्वांनी 30 ऑगस्ट रोजी एकत्र विषारी औषध घेतले. कर्जबाजारीपणामुळे या कुटुंबाने टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.
घरात कोणी नसल्याचे भासवण्यासाठी समोरच्या दरवाजाच्या बाहेरुन टाळे लावले होते आणि मागच्या दरवाजाने घरात जाऊन तो आतून दरवाजा बंद केला होता. ही घटना उघडकीस आली ज्यावेळी शेजारची मुलगी त्यांच्या घरी गेली. दोन-तीन वेळा आवाज देऊनही आतून कोणी आवाज दिला नाही. त्यामुळे त्यांना काहीतरी गडबड असल्याचा संशय आला आणि तिने आजुबाजूच्या लोकांना माहिती दिली, शेजारचे जेव्हा घरात गेले, त्यावेळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.