छत्तीसगडमध्ये 20 नक्षलवाद्यांनी केलं आत्मसमर्पण, 9 महिलांसह 11 पुरुषांवर होतं 33 लाख रुपयांचं बक्षीस

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलविरोधी मोहिमेला मोठं यश मिळालं आहे. तब्बल 33 लाख रुपयांचं इनाम असलेल्या 20 नक्षलवाद्यांनी मंगळवारी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. यामध्ये काही प्रमुख नक्षलवादी कमांडरांचाही समावेश आहे, ज्यांनी नक्षलवादी कारवायांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांमध्ये 9 महिलांसह 11 पुरुषांचा समावेश आहे. ज्यांच्यावर 33 लाख रुपयांचं बक्षीस आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आत्मसमर्पण नक्षलविरोधी अभियानाच्या सातत्यपूर्ण दबावामुळे आणि सरकारच्या पुनर्वसन धोरणाच्या प्रभावामुळे शक्य झालं. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला. यामागे पोलीस आणि प्रशासनाच्या सततच्या आवाहनांचा आणि नक्षलवाद्यांवरील वाढत्या कारवाईचा परिणाम असल्याचं बोललं जात आहे.

आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना छत्तीसगड सरकारच्या पुनर्वसन धोरणांतर्गत मदत आणि समर्थन दिलं जाणार आहे. यामध्ये शिक्षण, रोजगार आणि सामाजिक पुनर्वसनाच्या संधींचा समावेश आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अशा कारवायांमुळे नक्षलवादी चळवळ कमकुवत होत असून, अधिकाधिक नक्षलवादी आत्मसमर्पणासाठी पुढे येत आहेत.