छत्तीसगडमधील सुकमामध्ये 26 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

छत्तीसगडमधील नक्षलवाद प्रभावित सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले असून, बुधवारी 7 जानेवारी रोजी तब्बल 26 नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, आत्मसमर्पण केलेल्या या गटामध्ये 13 जहाल नक्षलवाद्यांचा समावेश असून, त्यांच्यावर शासनाने एकूण 65 लाख रुपयांचे इनाम जाहीर केले होते.

सुकमा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्मसमर्पण केलेल्या 26 नक्षलवाद्यांमध्ये 7 महिलांचा समावेश आहे. नक्षलवाद्यांचे पुनर्वसन करण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या ‘पुणे नार्कोम’ (परत या) अभियानामुळे प्रभावित होऊन आणि नक्षलवादी विचारधारेला कंटाळून या सर्वांनी सामान्य जीवनात परतण्याचा निर्णय घेतला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या सर्वांनी शरणागती पत्करली.

यामध्ये प्रामुख्याने हेमला लखमा (41), अस्मिता उर्फ ​​कमलू सनी (20), रामबती उर्फ ​​पदम जोगी (21) आणि सुंदरम पाले (20) या चार प्रमुख नक्षलवाद्यांचा समावेश आहे. या चार जणांवर एकूण 8 लाख रुपयांचे बक्षीस होते. आत्मसमर्पण केलेल्या सर्व नक्षलवाद्यांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी 50 हजार रुपये देण्यात आले आहेत. तसेच शासनाच्या धोरणानुसार त्यांचे पूर्ण पुनर्वसन केले जाईल आणि त्यांना सर्व सोयीसुविधा पुरवल्या जातील, असेही पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.