मध्य प्रदेशात विचित्र तापाची साथ; 2 महिन्यात सहा मुलांचा मृत्यू, आजाराचे निदान होत नसल्याने प्रशासन चिंतेत

आत्तापर्यंत आपण अनेक आजारांची नावे ऐकली असतील. यापैकी काही आजार गंभीर असतात ज्यावर उपचार करूनही ते बरे होत नाहीत. तर काही आजार हे लवकर बरे होणारे असतात. मात्र काही आजारांवर लवकर इलाज झाला नाही तर जीवावर बेतण्याची शक्यता असते. दरम्यान काही आजार असे असतात जे झाले तरी त्यांचे निदान डॉक्टरांनाही लागत नाही. असाच एका आजाराने सध्या मध्यप्रदेशात धुमाकूळ घातला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

छिंदवाडा जिल्ह्यातील गावांमध्ये गेल्या काही आठवड्यात मुलांमध्ये गंभीर आजारांच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये सुरू झालेल्या विषाणूजन्य तापामुळे आतापर्यंत सहा मुलांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये किडनी फेल होणे हे प्रमुख कारण होते. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने दक्षता घेतली असून त्याची सखोल चौकशी सुरू केली आहे.

मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी (CMHO) डॉ. नरेश गोन्नाडे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. ऑगस्टमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे विषाणूजन्य तापाचे रुग्ण वाढले. त्यामुळे मुलांना परसिया येथील सरकारी रुग्णालयात आणण्यात आले. 4 सप्टेंबर रोजी परसियाहून नागपूर येथील खाजगी रुग्णालयात रेफर केलेल्या एका मुलाचा मृत्यू झाला. यावेळी डॉक्टरांनी किडनी फेल झाल्यामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

दरम्यान, दोन दिवसांतच ६ सप्टेंबरपर्यंत आणखी दोन मुलांचा मृत्यू झाला. आता 26 सप्टेंबरपर्यंत एकूण मृतांची संख्या सहावर पोहोचली. सर्व प्रकरणांमध्ये मूत्रपिंडांशी निगडीत असणारी समान लक्षणे दिसून आली. त्यामुळे आता आरोग्य विभागाने 500 हून अधिक लोकांच्या रक्ताचे नमुने, यकृत आणि मूत्रपिंडाच्या चाचण्यांसह चाचण्या केल्या आहेत. परंतु अद्याप कोणत्याही विशिष्ट आजाराची पुष्टी झालेली नाही.