चिकन नगेट खाता-खाता मुलगी गुदमरली, तोंडातून बाहेर निघालेली वस्तू पाहून सगळेजण हादरले

3228

मॅकडोनाल्डमधून मागवलेला चिकन नगेट खाता-खाता एक लहान मुलगी गुदमरायला लागली. तिचा जीव वाचवण्यासाठी तिच्या आईने घशामध्ये बोट घालून वस्तू बाहेर काढली. चिकन नगेटच्या तुकड्यांसोबत जी वस्तू बाहेर आली ती पाहून या मुलीची आई जबरदस्त हादरली आहे.

लॉरा आर्बर ही तिच्या तीन मुलांसह मंगळवारी इंग्लंडमधील आल्डरशॉट इथल्या मॅकडोनाल्डच्या दुकानात गेली होती. तिथून तिने तिच्या मुलांसाठी 20 चिकन नगेट घेतली होती. घरी आल्यानंतर तिची मुलं ही नगेट खात बसली होती. अचानक मॅडी नावाची 6 वर्षांची मुलगी ही गुदमराला लागल्याचं तिच्या आईला म्हणजेच लॉराला दिसलं. तिने पटकन तिच्या घशात काय अडकलं आहे हे पाहिलं आणि बोट घालून नगेटचा तुकडा बाहेर खेचला. यावेळी तिला नगेटमध्ये तोंडाला लावायचा मास्कचा तुकडा असल्याचं तिला दिसून आलं. तिने इतर नगेटही नीट तपासले असता तिला आणखी दोन नगेटमध्ये मास्कचा तुकडा दिसून आला.

लॉराने नगेट ज्या ठिकाणीहून घेतले होते तिथे फोन करून मॅनेजरशी संवाद साधला. नगेटमध्ये मास्कचे तुकडे सापडल्याचे तिने या मॅनेजरला सांगितलं. यावर मॅनेजरने नगेट आपल्या इथे बनत नसून आम्ही फक्त तळून देतो असं सांगितलं. या प्रकारामुळे संतापलेल्या लॉराने हा प्रकार फेसबुकवर शेअर केला आहे. जर वेळीच माझं लक्ष गेलं नसतं तर माझ्या मुलीचा गुदमरून मृत्यू झाला असता असं तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे. इतर लोकांनी या प्रकारानंतर सावध व्हावं यासाठी आपण ही पोस्ट लिहिल्याचं मिरर युकेने दिलेल्या बातमीत म्हटलंय.

आपली प्रतिक्रिया द्या