
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. रविवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी आपल्या पक्षाच्या रणनीतीची माहिती दिली. याचवेळी त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबतच्या संबंधांवर भाष्य केले. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे आमचे मित्रच आहेत. गोव्यात आमची आघाडी झाली नसली तरी काँग्रेसची या दोन्ही पक्षांशी मैत्री कायम असेल, निवडणूक निकालानंतर दोघांसोबत काम करू, अशी पक्षाची भूमिका चिदंबरम यांनी मांडली.
गोव्यातील काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदासाठीच्या नावाची घोषणा निवडणुकीपूर्वी करायची की निकालानंतर, याबाबत उमेदवारांशी चर्चा केली जाईल. ज्या बाजूने एकमत असेल, त्याच अनुषंगाने पक्षाकडून निर्णय घेतला जाईल, असे चिदंबरम यांनी सांगितले. ते गोवा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे वरिष्ठ निवडणूक निरीक्षक आहेत. निवडणुकीच्या तयारीबाबत बोलतानाच त्यांनी काँग्रेसच्या विजयाचा दावा केला. गोव्यात काँग्रेस (गोवा फॉरवर्ड पार्टी) आणि भाजपमध्ये मुख्य लढत होईल. यात काँग्रेस बहुमतांनी विजयी होईल, असे ते म्हणाले. तसेच निकालानंतर आमच्या सरकारला इतर पक्षांनी पाठिंबा दिल्यास परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राप्रमाणे आघाडी झाली असती तर बरे झाले असते
शिवसेना आणि राष्ट्रवादी हे महाराष्ट्रात काँग्रेसचे मित्रपक्ष आहेत. ते गोव्यातही मित्रपक्ष बनले असते तर काँग्रेसला आवडले असते. आम्ही आमच्या बाजूने पूर्ण प्रयत्न केले. पण दुर्दैवाने आमच्यात एकमत होऊ शकले नाही. तरीदेखील आम्ही मित्र आहोत, यापुढेही मित्र म्हणून राहणार. निवडणूक निकालानंतर संधी मिळेल तिथे शिवसेना, राष्ट्रवादीसोबत काम करू, असा विश्वास चिदंबरम यांनी व्यक्त केला.


























































