खुर्ची डोक्यात जाण्यासारखे दुसरे पाप नाही, सरन्यायाधीश भूषण गवई यांचे परखड मत

काही जणांना खुर्ची मिळाली की ती लगेचच डोक्यात जाते. खुर्ची डोक्यात जाण्यासारखे दुसरे पाप नाही, असे परखड मत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केले आहे.

दर्यापूर सत्र न्यायालयाच्या उद्घाटनावेळी सरन्यायाधीश गवई यांनी हे परखड मत व्यक्त केले. खुर्ची न्यायाधीशांची असो की जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षकांची, ती या देशातील नागरिकांची सेवा करण्यासाठी मिळालेली असते. या खुर्चीचा योग्य तो सन्मान राखला गेला पाहिजे, असे सरन्यायाधीश गवई यांनी बजावले.

मला टीका करायला आवडत नाही. महाराष्ट्र पायाभूत सुविधांमध्ये मागे आहे असे बोलले जाते. पण मला असे वाटत नाही. सरकार कोणत्याही पक्षाचे असो न्याय विभागाची कामे अत्यंत तत्परतेने झाली पाहिजेत, असे सरन्यायाधीश गवई यांनी नमूद केले.

न्यायाधीशांनी वकिलांना मान द्यायला हवा

न्यायाधीशांनी वकिलांना मान द्यायला हवा. वकील व न्यायाधीशांमधील संबंध चांगलेच असले पाहिजे. तसेच कनिष्ठ वकिलांनी ज्येष्ठ वकिलांचा सन्मान करायला हवा. परंतू दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. एखादा तरुण कनिष्ठ वकील खुर्चीवर बसलेला असतो आणि ज्येष्ठ वकील त्याच्यासमोर उभा असतो, अशी खंत सरन्यायाधीश गवई यांनी व्यक्त केली.