खुर्चीवरून खाली खेचण्याचा इशारा देताच बांगलादेशच्या सरन्यायाधीशांचा राजीनामा

बांगलादेशातील हिंसाचाराचा ‘आगडोंब’ धगधगताच राहिला आहे. सत्ताबदलानंतरही आक्रमक पवित्रा कायम ठेवलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी शनिवारी थेट सर्वोच्च न्यायालयाला घेराव घातला आणि सरन्यायाधीशांनाही खुर्चीवरून खाली खेचण्याचा इशारा दिला. विद्यार्थ्यांनी अल्टिमेटम देताच सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांनी तातडीने पदाचा राजीनामा दिला. पाच दिवसांपूर्वीच शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता.

शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळून हंगामी सरकार सत्तेत आले. त्यानंतरही बांगलादेशातील हिंसाचाराची धग कमी होण्याची चिन्हे नाहीत. सत्ताबदलानंतरही विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू ठेवले आहे. शनिवारी सकाळी विद्यार्थ्यांनी सरन्यायाधीश हसन यांना पदावरून पायउतार होण्यासाठी दुपारी 1 वाजण्याचा अल्टिमेटम दिला होता. स्वतःहून पद सोडा, अन्यथा शेख हसीना यांच्याप्रमाणेच खुर्चीवरून खाली खेचू, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला.

या इशाऱ्यानंतर काही तासांतच ओबेदुल हसन यांच्यावर सरन्यायाधीश पद सोडण्याची नामुष्की ओढवली. कायदा आणि न्याय मंत्रालयाचे सल्लागार आसिफ नजरुल यांनी हसन यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. हसन यांचा राजीनामा प्राप्त झाला असून लवकरच तो राष्ट्रपती कार्यालयाकडे पाठवला जाईल, असे कायदा मंत्रालयाने स्पष्ट केले.

चितगावमध्ये सात लाख हिंदू उतरले रस्त्यावर

बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात उद्रेक झाला आहे. चितगावमध्ये शनिवारी सात लाख हिंदूंनी रस्त्यावर उतरत आपली ताकद दाखवली. हा देश कुणाच्या बापाचा नाही. आम्ही कुणालाही घाबरणार नाही, असे ठणकावत हिंदू बांधवांनी तीव्र निदर्शने केली. सुरक्षेची हमी आणि सर्व नागरिकांना समान अधिकार मिळालाच पाहिजे अशी मागणी यावेळी अंतरिम सरकारकडे करण्यात आली.

न्यायाधीशांची हसीना यांच्याशी मिलीभगत

सरन्यायाधीश व इतर न्यायाधीशांची शेख हसीना यांच्याशी मिलीभगत आहे. त्यांची हसीना यांच्यावर निष्ठा असून हसीना यांच्यासाठीच ते काम करीत आहेत, असा गंभीर आरोप आंदोलक विद्यार्थ्यांनी केला. या आरोपानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. सर्व न्यायाधीशांनी बैठक बोलावली होती. या बैठकीची हंगामी सरकारलाही माहिती दिली नव्हती. या गुप्त बैठकीच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर अनेक आरोप लावले आणि खुर्चीवरून खाली उतरण्यासाठी अल्टिमेटम दिला.

सय्यद रेफत अहमद नवे सरन्यायाधीश

ओबेदुल हसन यांच्या राजीनाम्यानंतर सय्यद रेफत अहमद हे बांगलादेशचे नवीन सरन्यायाधीश बनले आहेत. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास अहमद यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी अहमद यांना नियुक्त केल्याचे विधी मंत्रालयाच्या अधिसूचनेत म्हटले आहे.

पाच न्यायाधीशांचाही राजीनामा

दुपारी सरन्यायाधीशांनी राजीनामा दिला. त्यानंतरही सर्वोच्च न्यायालय आवारातील विद्यार्थी दूर हटले नाहीत. त्यामुळे अन्य पाच न्यायाधीशांनीही तातडीने राजीनामा दिले. यात न्यायमूर्ती एम. इनायतुर रहीम, न्यायमूर्ती जहांगीर हुसैन, न्यायमूर्ती मोहम्मद अबू जफर सिद्दीकी, न्यायमूर्ती मोहम्मद शाहिनूर इस्लाम आणि न्यायमूर्ती कशिफा हुसैन यांचा समावेश आहे.