
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे युवा आणि प्रॉमिसिंग नेते आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुक्तकंठाने स्तुती केली आहे.
मुख्यमंत्री येथे पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्र्यांची एकीकडे महाजनादेश यात्रा सुरू आहे, तर आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेलाही राज्यभरात जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात ठिकठिकाणी जल्लोषी स्वागत आणि शेतकरी युवकांशी दिलखुलास संवाद असेच चित्र पाहायला मिळत आहे.
आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले, आदित्य ठाकरे हे युवा आणि प्रॉमिसिंग नेते असून त्यांच्या यात्रेचे मी स्वागत करतो. शिवसेना-भाजप युतीबाबत बोलताना ते म्हणाले, संघर्षाच्या काळात आम्ही सोबतच राहिलो. आता तर आम्ही सत्तेमध्ये एकत्र आहोत, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी युती होणारच याचे पुन्हा एकदा स्पष्ट संकेत दिले.

























































