भाईंदर पालिकेच्या 358 सरळसेवा पदभरतीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती, हजारो सुशिक्षित बेरोजगारांचे स्वप्न भंगले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मीरा-भाईंदर पालिकेच्या 358 सरळसेवा पदभरतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे. या भरतीप्रक्रियेविरोधात भाजपचे स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांनी फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार फडणवीस यांनी आज तत्काळ आदेश काढत पदभरतीला रेड सिग्नल दिला. दरम्यान या भरतीला अचानक खीळ बसल्याने सुशिक्षित बेरोजगारांचे स्वप्न भंगले आहे.

मीरा-भाईंदर पालिकेमध्ये तब्बल 13 वर्षांनंतर सरळसेवा भरतीप्रक्रियेला सुरुवात झाली होती. महापालिकेत हक्काची नोकरी मिळेल या आशेने हजारो तरुणांनी तयारी केली. पालिकेने शासन मान्य असलेल्या मे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) यांना भरती प्रक्रियेचे काम दिले. त्या भरतीसाठी बेरोजगारांनी फी भरली. पात्र विद्यार्थ्यांच्या विविध जिल्ह्यांत परीक्षादेखील घेण्यात आल्या होत्या. मात्र ही संपूर्ण पद भरती अन्यायकारक असल्याची तक्रार भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 6 ऑक्टोबर 2025 रोजी केली. तसेच या भरतीला स्थगिती देण्याची मागणीदेखील मेहता यांनी केली.

विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला

नगरविकास विभागाचे सचिव डॉ. रवींद्र भराटे यांनी पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांना 6 एप्रिल रोजी स्थगितीचे लेखी पत्र दिले. सेवा प्रवेश नियम मान्य होत नाही तोपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. तसेच भरतीची संधी पुन्हा हिरावून घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.