उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार; संभाजीनगरातआज शिवसेनेची अतिविराट सभा

मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या विशाल मैदानावर उद्या बुधवारी सायंकाळी 6 वाजता शिवधनुष्याचा टणत्कार घुमणार आहे.  शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. मराठवाडय़ात सर्वात प्रथम स्थापन झालेल्या शिवसेनेच्या संभाजीनगर शाखेचा 37 वा वर्धापनदिन तसेच शिवसंपर्क अभियानाअंतर्गत होणाऱया या सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून मराठवाडय़ाच्या कानाकोपऱयातून संभाजीनगरकडे निघालेले शिवसैनिकांचे जथे पाहता ही जाहीर सभा गर्दीचे सर्व विक्रम मोडीत काढणार आहे. उद्धव ठाकरे काय बोलणार, याबद्दल प्रचंड उत्सुकता असून अवघ्या देशाचे लक्ष या सभेकडे लागले आहे.

या जाहीर सभेला शिवसेना नेते खासदार संजय राऊत, युवासेना प्रमुख तसेच पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांची उपस्थिती असणार आहे.

पोलिसांचा कडक बंदोबस्त

मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणाऱया या विराट जाहीर सभेसाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. अडचण होऊ नये म्हणून वाहतुकीतही काही बदल करण्यात आले आहेत.

होय, हे संभाजीनगरच!

या सभेचे टीझर प्रचंड व्हायरल झाले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली ‘होय, हे संभाजीनगरच!’ ही गर्जना सोशल मीडियावर गाजत आहे. व्हॉट्सऍप, फेसबुक, ट्विटरवर हे टीझर प्रचंड लोकप्रिय झाले आहे. देव, देश आणि धर्मासाठी सभेला यायलाच हवे, असे आवाहनही या टीझरमध्ये करण्यात आले आहे. संभाजीनगरमधील सर्व मुख्य चौक, रस्त्यांवर जाहीर सभेचे होर्डिंग्ज झळकले आहेत.