Pune news – पडवीत चिमुरडा झोका घेत असताना अंगणात बिबट्या आला अन्… थरकाप उडवणारा व्हिडीओ

वाडा रस्त्यावरील काळेचीवाडी येथे फॉर्म हाऊसमध्ये काम करणाऱ्या कामगाराचा मुलगा बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला. सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला. वन विभागाने २२ सप्टेंबर रोजी निशाणवाडी, काळेवाडी हद्दीत पिंजरा लावला होता. दोन बिबटे येथील स्थानिकांना दिसल्याने भीतीचे वातावरण आहे.

पिंपरखेड गावात रोहन बोंबे या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना खेड तालुक्यातील काळेचीवाडी येथे हा प्रकार समोर आला आहे. बाळासाहेब पाचारणे यांच्या फार्महाऊसवर चाळीसगाव येथील दोन कुटुंबे वास्तव्यास आहेत. रात्रीच्या वेळी उमेश विक्रम चव्हाण (वय १३) हा ओसरीवर झोके घेत असताना मांजराला बघून बिबट्या गेटच्या आत आला. मुलगा घरात पळाल्याने थोडक्यात बचावला. हा प्रकार १० दिवसांनी समोर आला.

दरम्यान, काळेचीवाडी, सातकरस्थळ येथे बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आल्याची वनरक्षक संतोष भागडे यांनी माहिती दिली.