वृक्ष बिया लागवडीसाठी मातीत माखले चिमुकल्यांचे हात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, शिरूर कासार

शिरूर कासारपासून जवळच ऐन डोंगरच्या कुशीत असलेल्या रामनगर वस्तीशाळा (वारणी) ही शाळा नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमांनी चर्चेत असते. नित्याचा पडणारा दुष्काळ व त्याची दाहकता पाहून झाडांशिवाय पर्याय नाही ही गोष्ट या चिमुकल्यांच्या लक्षात आली. व त्यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत अभ्यासाबरोबर विविध वनस्पतीच्या बिया जमा करण्याची तयारी सुरू झाली. प्रत्येकाने 50 ते 100 पर्यंत घरी, गल्लीत, गावात वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षांच्या बिया जमा करण्याची जणू स्पर्धाच लागली.

या चिमुकल्या हातांनी बघता बघता हजरो विविध वृक्षांच्या बिया जमा केल्या व व्यवस्थित वाळवून शिक्षकांच्या सूचने नुसार त्या संग्रही केल्या. प्रत्येकाने वेगवेगळ्या झाडांच्या बिया ज्याच्या जास्त व वेगवेगळ्या वनस्पतीच्या त्याचा प्रकल्प एक नंबर. म्हणून अश्या प्रकारे विद्यार्थ्यांनी सुट्टीचाही सदुपयोग चांगल्या प्रकारे केला. लिंब, आंबा, चिंच, जांभूळ, रिठा, गुंज, आवळा अश्या आयुर्वेदिक ते पेरू, चिक्कू, फणस, बोरं, कारं अशा फळांबरोबर रानातला रानमेवा करवंदाच्या बियांसह रान भेंडी, बाभूळ अशा वृक्षापर्यंत विभिन्न प्रकारच्या बियांचा संग्रह तयार झाला.

तब्बल दहा हजार बिया, त्यासुध्दा 26 प्रकारच्या झाडांच्या. शाळा सुरू झाल्यावर पाउसही समाधानकारक पडला. त्यामुळे शाळेच्याच जवळ असणाऱ्या टेकडीवर या सर्व बियांची काल या चिमुकल्या हातांनी रोपणही केले. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्या सोबत शाळेचे मुख्याध्यापक दीपक केदार सर व आप्पासाहेब शिंदे सर होते.