लाल माकडांच्या कुरापती सुरूच, उत्तराखंड सीमेजवळ चीन उभारणार 400 गावे

लडाख, अरुणाचल प्रदेशनंतर लाल माकड चीनने आता उत्तराखंडच्या सीमेवर कुरापती सुरू केल्या आहेत. प्रत्यक्ष ताबा रेषेपासून (एलएसी) 11 किलोमीटर अंतरावर 250 घरांचे डिफेन्स व्हिलेज उभारले जात आहे. एलएसीनजीक अशीच तब्बल 400 गावे उभारण्याची चीनची योजना असल्याचे धक्कादायक वृत्त आहे.

लडाख, अरुणाचल प्रदेशमध्ये हिंदुस्थानच्या हद्दीत चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीकडून अनेकदा घुसखोरी केली जाते. विशेष म्हणजे एका बाजूला हिंदुस्थानबरोबर राजनैतिक आणि लष्करी पातळीवर चर्चा सुरू ठेवायची आणि दुसरीकडे सीमेवर कुरापती करायच्या असे चीनचे धोरण आहे. आता चीनने उत्तराखंडच्या सीमाभागात कुरापती सुरू केल्या आहेत.

प्रत्येक गावात 250 घरे

– चीनने अनेक महिन्यांपासून उत्तराखंड सीमेवर आपल्या हालचाली वाढविल्या. पहिल्यांदा एलएसीपासून 35 किलोमीटरवर 56 घरे बांधून गाव वसविले. पिपल्स लिबरेशन आर्मीसाठी हे डिफेन्स व्हीलेज आहे.
– यानंतर चीन एलएसीच्या आणखी जवळ 11 किलोमीटरपर्यंत आला आहे. या पूर्व सेक्टरमध्ये 400 गावे वसविण्याची चीनची योजना आहे. या प्रत्येक गावात 250 घरे असणार आहेत.
– गावे वसविताना तेथे सुविधा उभारण्यात येतील. चीनी लष्कराच्या हालचाली वाढणार आहेत.

हिंदुस्थानींचे स्थलांतर वाढले

उत्तराखंड या पहाडी राज्याची 350 किलोमीटरची सीमा चीनशी जोडली गेली आहे. या सीमावर्ती भागात उपजिविकेचे साधन नसल्याने मोठय़ा प्रमाणावर स्थलांतर होत आहे. दरम्यान, चीनच्या नव्या कुरापतींमुळे हिंदुस्थानचे लष्कर अधिक अलर्ट झाले आहे.