
एकेकाळी चीन जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश होता. आता हिंदुस्थानची लोकसंख्या जगात सर्वात जास्त आहे. चीनमधील जन्मदर कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर चीन सरकारने प्रजनन दर वाढवण्यासाठी काही पावले उचलली आहेत. नव्या वर्षापासून चीन आपल्या राष्ट्रीय आरोग्य विमा कार्यक्रमाचा विस्तार करणार आहे. विम्यामध्ये मूलाच्या जन्माचा खर्च पूर्णपणे कव्हर केला जाणार आहे.
चीनमध्ये प्रजनन दर घटल्याने लोकसंख्या कमी होऊ लागली आहे. याचा परिणाम चीनच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. हे लक्षात घेऊन सरकारने शनिवारी बीजिंगमध्ये आयोजित राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा संमेलनात विमा कव्हरेज वाढवण्याची घोषणा केली.
घटता जन्मदर पाहता अलीकडच्या काळात चीनने अनेक निर्णय घेतले आहेत. प्रसूती, मुलांचे संगोपन, शिक्षण यावरील खर्च कमी करण्याच्या दृष्टीने काम सुरू केले आहे. सध्या चीनमध्ये मातृत्व विमा योजनेंतर्गत 25.5 कोटी लोकांना कव्हरेज मिळत आहे.


























































