
हिंदुस्थान आणि चीनच्या सीमेवर गलवान खोऱ्यात निर्माण झालेल्या तणावावर अद्याप तोडगा निघालेला नाही. दोन्ही देश चर्चेतून हा मुद्दा निकाली काढण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्याला अजून यश मिळालं नसल्याचं कळतं आहे. चीनने हिंदुस्थानी हद्दीत घुसखोरी करण्याचा मंगळवारी प्रयत्न केला होता, यावेळी हिंदुस्थानी जवानांनी त्यांचा प्रतिकार केला. चिनी सैनिकांनी हॉकीस्टीक, रॉडने आपल्या जवानांवर हल्ला केला होता. हिंदुस्थानचे 20 जवान या हल्ल्यात शहीद झाल्याचे वृत्त आहे. हिंदुस्थाननेही चीनचे 43 सैनिक यमसदनी पाठवल्याचं समजते आहे. गेल्या अनेक दिवसांपासून निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती ही अद्याप निवळली नसून ती अधिक तणावपूर्ण बनत चालली आहे.

चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या 20 जवानांची नावे आज जाहीर करण्यात येणार आहेत. 15-16 जूनच्या रात्री हा हल्ला करण्यात आला होता. हिंदुस्थानी सैनिकांच्या तुकडीचे कमांडीग ऑफिसर असलेले कर्नल संतोष बाबू यांच्या नेतृत्वात एक तुकडी चिनी कँपमध्ये गेली होती, यावेळी ते निशस्त्र होते असं सांगण्यात येत आहे. आजतकच्या वृत्तानुसार ही तुकडी चिनी लष्करी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी गेली होती. मात्र तिथे चिनी सैनिकांनी दगाबाजी करत दगड, खिळे लावलेले दांडके याच्या सहाय्याने सैनिकांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात कर्नल संतोष बाबू आणि 2 जवान जागीच शहीद झाले. इतर जवान या हल्ल्यात जखमी झाले होते.

ज्या ठिकाणी हिंदुस्थानी सैनिकांवर हल्ला करण्यात आला त्या जागेच्या खालून श्योक नदी वाहाते. या नदीत काही सैनिक वाहून गेल्याचे कळते आहे. काही सैनिक कडाक्याची थंडी असल्याने जखमांतून बरे झाले नाही आणि दगावले असेही कळते आहे. चीनच्या दगाबाजीला हिंदुस्थानी जवानांनी चोख उत्तर ताबडतोब दिल्याचे सांगण्यात येत आहे. हल्ल्यात चीनचे किती नुकसान झाले हे त्यांनी उघडपणे सांगितलेले नाही, मात्र त्यांचे 43 जवान मारले गेल्याचे अथवा जबरी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. चीनच्या या दगाबाजीमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असून दिल्लीमध्ये सातत्याने या मुद्दावरून बैठका सुरू आहेत.
























































