
सामना ऑनलाईन, चँगझू
हिंदुस्थानी बॅडमिंटनपटूंसाठी मंगळवारचा दिवस संमिश्र यशाचा ठरला. चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेत एकीकडे या वर्षामध्ये दिमाखदार कामगिरी करणाऱया पी. व्ही. सिंधू हिने प्रतिस्पर्ध्याला हरवत आगेकूच केले, तर दुसरीकडे सायना नेहवाल हिला पराभवाचा सामना करावा लागला.
तिसरी सीडेड पी. व्ही. सिंधू हिने जागतिक क्रमवारीत 39व्या स्थानावर असलेल्या जपानच्या सेईना कावाकामी हिला 21-15, 21-13 अशा फरकाने पराभूत करीत सलामीचा अडथळा पार केला, मात्र कॉमनवेल्थ गेम्समध्ये दोन वेळा गोल्ड मेडल्स जिंकणाऱया सायना नेहवाल हिला कोरियाच्या सुंग जी ह्यून हिच्याकडून 22-20, 8-21, 14-21 अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. सायना नेहवाल हिने 2014 साली चायना ओपन स्पर्धा जिंकली होती. ही स्पर्धा जिंकणारी ती पहिलीच हिंदुस्थानी खेळाडू होय.
मनू अत्री-सुमित रेड्डीचेही आगेकूच
पी. व्ही. सिंधूप्रमाणे मनू अत्री व सुमित रेड्डी यांनीही पुरुषांच्या दुहेरीत आगेकूच केले. दोघांनी लिओ मीन चून – सु चिंग हेंग या चीन तैपईच्या जोडीवर 13-21, 21-13, 21-12 अशा तीन गेममध्ये सनसनाटी विजय मिळवत पुढे पाऊल टाकले.




























































