आता चंद्रही मेड इन चायना! दरवर्षी स्ट्रीटलाईटचे 24 कोटी रुपयांचे वीज बिल वाचणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, शांघाय

चला तो शाम तक, नही तो चाँद तक… अशी हेटाळणीयुक्त तारीफ चायनीज वस्तूंची केली जाते. मात्र आता तर चीनने चक्क चंद्रच बनवण्याचे ठरविले आहे. एक नव्हे, दोन नव्हे तर तीन चंद्र आकाशात सोडण्याचा संकल्प चीनने केला असून त्यासाठी 2020ची डेडलाईनही आखली आहे.

सिचुआन प्रांताची राजधानी चेंगडू शहरावर पृथ्वीपासून अवघ्या 500 किमी.वर हे कृत्रिम चंद्र सोडण्यात येतील, अशी माहिती वू चेनफेंग यांनी दिली. वू चेनफेंग  हे चेंगडू एरोंस्पेस सायन्स अँड टेक्नोलॉजी मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम रिसर्च इन्स्टिटय़ूट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आहेत. ही संस्था अवकाश संशोधन क्षेत्रात काम करते.

असे असतील कृत्रिम चंद्र

खरा चंद्र पृथ्वीपासून सुमारे 3 लाख 80 हजार कि.मी.वर आहे. तर चीनचे कृत्रिम चंद्र अवघ्या 500 कि.मी.वर असतील.

उपग्रहाने हे चंद्र आकाशात सोडण्यात येतील. अवघ्या 500 कि.मी.वर असल्याने नैसर्गिक चंद्रापेक्षा अधिक प्रकाश असेल.

चेंगडू शहरावर हे चंद्र स्थिरावतील. चेंगडू शहराच्या 80 किलोमीटरच्या परिसरात रात्रीच्या वेळी लख्ख प्रकाश मिळेल. त्यामुळे पथदिव्यांची गरज भासणार नाही. चेंगडू महापालिकेचे दरवर्षी 24 कोटी रुपये वीजबीलापोटी वाचतील.रशियानेही गेल्या वर्षी कृत्रिम चंद्र आकाशात सोडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु हा प्रयोग फसला होता.

दुष्परिणाम होणार

नैसर्गिक चंद्रामुळे पौर्णिमा, अमावस्या हे निसर्गाचे चक्र सुरू असते. अनेक नैसर्गिक समतोल साधले जातात. कृत्रिम चंद्रामुळे खगोलीय घटनांना अडथळा निर्माण होईल. रात्रभर नेहमीच प्रकाश पडल्याने प्राण्यांना त्रास होईल. पिके, झाडांची वाढ खुंटेल अशी चिंता व्यक्त करीत काही वैज्ञानिकांनी कृत्रिम चंद्राला विरोध केला आहे.