
लडाख, सिक्कीम, अरुणाचल प्रदेशात घुसखोरी करणाऱया चीनने आता आकाशातही घुसखोरी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. हवामान बदल कार्यक्रम व्यापक प्रमाणात राबवताना चीन हिंदुस्थानचा पाऊसच चोरण्याच्या तयारीत आहे. यामुळे भविष्यात हिंदुस्थानातील अनेक भागांत दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती हवामानतज्ञांकडून व्यक्त होत आहे.
साऊथ चायनाच्या ‘मॉर्निंग पोल’ने याबाबत वृत्त दिले आहे. ‘क्लाऊड सीडिंग’ म्हणजे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कृत्रिम पाऊस पाडला जातो. विमान किंवा आर्टिलरी गनच्या मदतीने आकाशात ढगांवरती सिल्व्हर आयोडाइड आणि कोरडय़ा बर्फाचा मारा करून एखाद्या दुष्काळी भागात कृत्रिम पाऊस पाडला जाऊ शकतो. जगभरात अनेक ठिकाणी हा प्रयोग दरवर्षी होतो. परंतु चीनच्या प्रयोगामुळे हिंदुस्थानसह शेजारील देशांचा पाऊस चोरला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हिंदुस्थानात कृत्रिम पावसाचा प्रयोग अपयशी
कृत्रिम पावसाचा प्रयोग जगभरात होतो. हिंदुस्थानातही अनेकदा प्रयत्न केले, पण त्यात फारसे यश आले नाही. महाराष्ट्रात सोलापूर, नगर, संभाजीनगर, धाराशिव, विदर्भ या दुष्काळी पट्टय़ात तसेच कर्नाटकात हुबळी, म्हैसूर येथेही प्रयोग काही वर्षांपूर्वी झाले. पण त्यात फारसे यश मिळाले नाही. हिंदुस्थानसह अनेक देशांचे प्रयत्न स्वतःच्या भागापुरतेच मर्यादित होते. मात्र, चीनने हवामान बदल कार्यक्रम व्यापक प्रमाणात राबवताना निसर्गातच मोठे बदल करण्याची तयारी सुरू केली आहे.
आकाशात नदीची निर्मिती करण्याचा प्रयोग
चीनने 2016 पासून तियान्हे म्हणजे आकाशात नदीची कल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या कामाला सुरू केल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. हवामान बदल कार्यक्रमाची व्याप्ती चीनने प्रचंड प्रमाणात वाढवली. येत्या पाच वर्षांत 55 लाख चौरस कि.मी. भागात ढग निर्माण करून कृत्रिम पाऊस पाडण्याची चीनची योजना आहे. चीनचा हा भूभाग हिंदुस्थानच्या दीडपट मोठा आहे. याद्वारे चीनला 7 टक्के जादा पाऊस मिळेल.
याचा थेट परिणाम हिंदुस्थानवर कसा होईल हे आताच सांगता येणार नसले तरी तिबेटसारख्या सीमालगत भागात चीनने हा प्रयोग केल्यास हिंदुस्थानातला पाऊस चोरला जाऊ शकतो. त्यामुळे दुष्काळाची भीती आहे.
चीनकडून सध्या निसर्गात घुसखोरी होतेय. हवामानात हवा तसा बदल केला जातो. जेव्हा नको असेल तेव्हा पाऊस रोखलाही जातो. बिजिंगमध्ये महत्त्वाचा राजकीय कार्यक्रम असेल तर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आकाश एकदम निरभ्र आणि स्वच्छ बनते. पण आता देशभरात चीन कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविणार असल्याने हिंदुस्थानची चिंता वाढली आहे.





























































