
चिनी परराष्ट्रमंत्री आणि विशेष प्रतिनिधी वांग यी 18 ऑगस्ट 2025 रोजी हिंदुस्थान दौऱ्यावर येत आहेत. येथे ते हिंदुस्थानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी भेटणार आहेत. जून 2020 मधील गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर ही वांग यी यांची पहिली हिंदुस्थान भेट आहे. या भेटीत दोन्ही देशांमधील सीमा विवाद आणि द्विपक्षीय संबंधांवरील चर्चा होणार आहे. विशेष प्रतिनिधी स्तरावरील ही वार्ता हिंदुस्थान-चीन संबंध सुधारण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.
गलवान संघर्षानंतर दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी अनेक पातळ्यांवर चर्चा झाली आहे. डेपसांग आणि डेमचोक येथील सैन्य माघारीनंतर आता संयुक्त गस्तीवरही सहमती झाली आहे. या भेटीत सीमेवरील शांतता आणि स्थैर्य टिकवण्यावर भर दिला जाणार आहे, असे बोलले जात आहे. ज्यामुळे हिंदुस्थान-चीन संबंधांना नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.