चीनी सैनिक हिंदुस्थानी सीमेत करत होते घुसखोरी, हिंदुस्थानी जवानांनी उधळला डाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि चीनदरम्यान पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला होता. चीनचे काही सैनिक हिंदुस्थानी हद्दीत घुसखोरी करून तंबू लावत होते. पण हिंदुस्स्थानच्या जवानांनी त्यांचा डाव उधळून लावून त्यांना हुसकावून लावले आहे. मिळालेल्या माहितीनुसार चीनचे किमान 500 सैनिक घुसखोरी करत होते.

शनिवारी रात्री चीनचे 500 सैनिक गलवान खोर्‍यातील पँगाँग खोर्‍याजवळ घुसखोरी करत होते. तसेच तंबू ठोकून कँप लावत होते. तेव्हा हिंदुस्थानी जवानांनी त्यांना हुसकावून लावले. या दरम्यान दोन्ही देशाच्या सैनिकांदरम्यान कुठलीही झटापट झाली नसल्याची माहिती आहे.

असे असले तरी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने हे वृत्त फेटाळले असून चीनने कुठल्याही प्रकारे घुसखोरी केली नसल्याचे म्हटले आहे. चीनी सैनिकांनी कुठलीच सीमा पार केली नाही आणि याबाबत हिंदुस्थानशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले आहे.
सोमवारी सकाळी हिंदुस्थान सरकारने एक पत्र जारी करून याबात अधिकृत माहिती दिली आहे. लडाखच्या पूर्व भागात पँगाँग खोर्‍याजवळ दोन्ही देशांचे सैनिक समोरासमोर आले होते, चीनच्या सैनिकांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता जो हिंदुस्थानी जवानांनी हाणून पाडला असे पत्रकात म्हटले आहे.