
चीनमध्ये थैमान घातलेल्या मेटान्यूमो व्हायरसने बंगळुरू-नागपूरनंतर आता मुंबईमध्येही इंट्री केली आहे. सहा महिन्यांच्या चिमुकलीला ही लागण झाली असून तिच्यावर पवईच्या हिरानंदानी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या रुग्णाबाबत स्थानिक प्रशासनाला 1 जानेवारी रोजीच माहिती देण्यात आल्याचे हिरानंदानी रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
खासगी रुग्णालये सज्ज
मेटान्यूमो व्हायरस हा नवा विषाणू नसून जुनाच विषाणू आहे. तो कोरोनासारखा भयावहदेखील नाही. त्यामुळे काळजी करण्यासारखे कोणतेही कारण नसल्याचे खासगी रुग्णालय समन्वयक डॉ. गौतम भन्साळी यांनी सांगितले. याचा प्रसार सध्या वाढलेला नसला तरी खासगी रुग्णालयांमध्ये सर्व प्रकारची आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहितीही त्यांनी दिली.
मेटान्यूमो व्हायरसबाबत मुंबईकरांनी घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
गुजरातमध्ये आणखी एक रुग्ण
गुजरातच्या सबरकांठा जिह्यातील हिंमतनगर शहरात ह्युमन मेटान्युमोव्हायरसची बाधा झालेला संशयित रुग्ण आढळला आहे. 8 वर्षांच्या मुलाला या विषाणूची बाधा झाल्याचा संशय असून त्याच्या रक्ताचे नमुने तपासण्यात येत आहेत. दरम्यान, देशात आता मेटान्यूमोव्हायरसच्या रुग्णांची संख्या 10 वर पोहोचली आहे.
मेटान्यूमो व्हायरसची लागण झालेल्या या मुलीला 1 जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या मुलीला खोकला होता आणि ऑक्सिजनची पातळी 84 पर्यंत खाली होती. मात्र या विषाणूवर कोणतेही विशिष्ट उपचार नसल्याने लक्षणांनुसार या मुलीवर उपचार करण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
पवईच्या हिरानंदानी रुग्णालयाच्या माहितीनुसार सहा वर्षांच्या मुलीला मेटान्यूमो व्हायरसची लागण झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने राज्य सरकारच्या निर्देशानुसार मुलीचे सँपल ‘एनआयव्ही’, पुणेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. सदर मुलीची प्रकृती सुधारली असून तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे.- डॉ. दक्षा शहा, कार्यकारी आरोग्य अधिकारी






























































