चिंतामणीच्या आगमनात चोरट्यांची हातसफाई 

चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमनाच्या वेळी चोरटय़ाने हातसफाई केल्याची घटना घडली आहे. चोरटय़ाने भक्तांचे मोबाईल, सोन्याची चैन चोरी केल्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी सहा गुन्हे नोंद केले आहे. तर चोरी करणाऱ्या सुनील म्हस्केला काळाचौकी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

लालबाग परळमधील प्रसिद्ध गणेश मंडळापैकी एक चिंचपोकळीचा चिंतामणी. शनिवारी चिंतामणीचा आगमन सोहळा होता. या सोहळ्यासाठी वाहतुकीत देखील तात्पुरते बदल करण्यात आले होते. मोठय़ा संख्येने भाविक लाडक्या बाप्पाला याची देही याची डोळा पाहण्यासाठी दूरदूरहून आले होते. ढोलताशांच्या गजरात बाप्पाची मिरवणूक सुरू होती. या मिरवणुकीत चोरटय़ाने चांगलीच हातसफाई केली.  गर्दीत नाचत असतानाच चोरटय़ाने भाविकांचे मोबाईल, सोनसाखळी, पाकीट चोरले. सहा जणांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हे नोंद करून तपास सुरू केला आहे.