
सामना प्रतिनिधी। चिरनेर
रायगड जिल्ह्यातील पहिली डिजिटल शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सारडे शाळेतील विद्यार्थ्यांनी सत्ताधाऱ्यांची ‘शाळा’ घेतली. ग्रामीण शासन व्यवस्थेची माहिती व्हावी म्हणून विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायतीला भेट दिली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी सत्ताधाऱ्यांना विविध प्रश्न विचारून भंडावून सोडले.
उरण तालुक्यातील सारडे ही शाळा विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे नेहमी चर्चेत असते. विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे वैशिष्यपूर्ण शिक्षण देऊन त्यांची शैक्षणिक पातळी उंचावण्यावर या शाळेतील शिक्षकांचा नेहमी प्रयत्न असतो. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त ग्रामीण शासन व्यवस्थेची माहिती व्हावी म्हणून ‘ग्रामपंचायत भेट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत कार्यालयात नेण्यात आले.
तेथे विद्यार्थ्यांनी सरपंच,उपसरपंच, ग्रामसेवक तसेच ग्रामपंचायत सदस्यांना ग्रामपंचायतिची रचना,ग्रामपंचायतीचा कार्यकाल, ग्रामपंचायतिचे उत्पन्न, त्याचा होणार विनियोग,ग्रामपंचायत तिची कार्ये सरपंच पदाची पात्रता, त्यांचे कार्य,ग्रामपंचायत सदस्यांची पात्रता व त्यांची कार्य,ग्रामसेवकाची नियुक्ति, त्याची कार्यप्रणाली असे विविध प्रश्न उपस्थित करून त्यांना भांडावून सोडले. विद्यार्थी प्रश्न विचारीत असताना सरपंच,ग्रामसेवक व सदस्यांची दमछाक होत होती. तरीही त्यांनी विद्यार्थ्यांना समर्पक उत्तरे देऊन, विद्यार्थ्यांच्या चौकस बुद्धीचे सर्वांनी कौतुक केले.




























































