चॉकलेटच्या बदल्यात पाकिस्तानातून साखरेची आयात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन

एखाद्या वस्तूची निर्यात केल्यास त्यासाठी लागणारा कच्चा माल आयात करता येईल असा केंद्राने नियम केला होता. त्याचा फायदा घेऊन एका व्यापाऱ्याने पाकिस्तानला चॉकलेट निर्यात करून पाकिस्तानची साखर आयात केली असे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानसभेत लेखी उत्तरात सांगितले.

प्रश्नोत्तरांच्या तासात शिवसेना आमदार तृप्ती सावंत आदींनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत पाकिस्तानमधून साखर आयात करण्यात आल्याबाबत प्रश्न विचारला होता. राज्यात साखरेचे विक्रमी उत्पादन झालेले असतानाही नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीतील गोदामात पाकिस्तानातून ६० मेट्रिक टन साखर आयात केली होती. राज्यात साखरेचे विक्रमी उत्पादन झालेले असतानाही पाकिस्तानातील साखर आयात का करण्यात आली अशी विचारणा केली होती. त्यावर पाकिस्तानातून २८ लाख मेट्रिक टन साखर आयात केल्याचे लेखी उत्तरात नमूद केले आहे. निर्यात वाढीसाठी एखाद्या वस्तूची आयात केल्यास त्यासाठी लागणारा कच्चा माल आयात करता येईल असा नियम केंद्र सरकारने केला होता. त्याचा फायदा घेऊन एका व्यापाऱ्याने पाकिस्तानला चॉकलेट निर्यात करून साखर आयात केली होती. त्यासाठी त्याने केंद्र किंवा राज्य सरकारची परवानगी घेतली नव्हती. या साखर आयातीत केंद्र व राज्य सरकारचा कोणताही संबंध नाही असे लेखी उत्तरात स्पष्ट करण्यात आले आहे.