
उरण -नवघर येथील द्रोणगिरी नोड मधील इंडियन ऑईल टॅकिंग लिमिटेड कंपनीला ( इंडियन ऑईल अदानी वेंचर्स अदानी व्हेंचर) भुईभाड्यापोटी थकविलेल्या ५४७ कोटी रुपये सात दिवसात भरण्याचे आदेश सिडकोने दिले आहेत. मुदतीत रक्कम न भरल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही सिडकोने कंपनीला नोटीसीद्वारे दिला आहे.
उरण-धुतुम ग्रामपंचायतीच्या हद्दीतील द्रोणागिरी नोड मधील सेक्टर -१ मधील प्लॉट क्रमांक १०१ वर इंडियन ऑईल टॅंक प्रकल्प आहे. हा प्रकल्प दोन – तीन वर्षांपूर्वी इंडियन ऑईल अदानी वेंचर्स अदानी व्हेंचरने टेकओव्हर केला आहे. धुतुम ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या या प्रकल्पातून १९९६ पासून जेएनपीए बंदरातून परदेशातून आयात करण्यात येणाऱ्या तेलजन्य पदार्थांची साठवणूक करणाऱ्या लाखो किलो लिटर्सच्या टाक्या आहेत. या प्रकल्पांसाठी सिडकोने द्रोणागिरी नोड मधील सेक्टर -१ मधील प्लॉट क्रमांक १०१ वरील भुखंड १७ ऑक्टोंबर १९९६ साली भुईभाड्याने दिलेला आहे. मात्र तेव्हापासून भाड्याने दिलेल्या भुखंडाचे भाडे भरण्यात सातत्याने दिरंगाईच चालविली होती.
क़ंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे शासनाचा अतोनात महसूल बुडत असल्याने रांजणपाडा-उरण येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते राम दशरथ पाटील यांनी सिडको, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मागील १५ वर्षांपासून तक्रारीतुन कंपनीने आराखड्याप्रमाणे बांधकाम केले नसल्याचे व बांधकामांला ओसीही दिली नसल्याची बाब शासकीय विभागाच्या निदर्शनास आणून दिली. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही शासकीय यंत्रणा कारवाई करण्यास सातत्याने टाळाटाळ करीत असल्याने राम पाटील यांनी ही गंभीर बाब आमदार नाना पटोले यांच्या निदर्शनास आणून दिली. पटोले यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न मांडल्यानंतरच जाग आलेल्या सिडकोने अखेर भुईभाड्यापोटी थकविलेल्या ५४७ कोटी रुपये सात दिवसात भरण्याचे आदेश सिडकोने दिले आहेत, अशी माहिती तक्रारदार राम पाटील यांनी दिली. बजाविण्यात आलेल्या ५४७ कोटी रुपयांच्या थकित नोटीसीमध्ये प्रशासकीयय खर्च, जीएसटी, दिरंगाई रक्कम, सेवा खर्च आदींचा समावेश आहे.



























































